Saturday, May 17, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीपालघर

कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली. पोलिसांनी नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर येथील एका निवासी इमारतीमधील अमली पदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या बेकायदा कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत रीटा फती कुरेबेवेई नावाच्या नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली. पोलिसांनी एमडी अर्थात मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत पाच कोटी साठ लाख चाळीस हजार १५० रुपये एवढी आहे.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी अंशित प्लाझातील एका सदनिकेवर (फ्लॅट) धाड टाकून कारवाई केली. सदनिकेत एमडीवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज होती. पोलिसांनी एमडीचा साठा तसेच एमडीवर प्रक्रिया करण्याची यंत्रणा या दोन्हीची जप्ती केली आणि महिलेला अटक केली. अटक केलेल्या महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. पोलीस याच प्रकरणात हेन्रीउचेन्ना उवाक्वेचाही शोध घेत आहे.

रीटा फती कुरेबेवेईकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रेच नव्हती. यामुळे रीटा फती कुरेबेवेईविरुद्ध भारतात घुसखोरी करुन बेकायदा कृत्य केल्याचा आणखी एक आरोप ठेवण्यात आला आहे. ही कारवाई केल्यानंतर संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Comments
Add Comment