
अभियांत्रिकीसह देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक
मुंबई (वार्ताहर): मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील. रविवारी सकाळी ११.५ ते दुपारी ३.४५ दरम्यान हा ब्लॉक असेल. या कालावधीत माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
कुर्ला वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ४.४० दरम्यान ब्लॉक असेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम-सांताक्रूझ दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० दरम्यान ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे.