
महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध
मुंबई : उच्च रक्तदाबामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे पक्षाघात, हृदयाचे विकार, किडनीचे आजार, नेत्र विकार इत्यादी. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रतिदिन ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्य धोक्यात येते. मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या सर्वेनुसार, मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मिठाचे सेवन करतात. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे.
उच्च रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. उच्च रक्तदाब 'सायलेंट किलर' म्हणूनही ओळखला जातो. उच्च रक्तदाब शरीराला हळूहळू हानी पोहोचवतो; परंतु योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. जागतिक रक्तदाब दिन १७ मे २०२५ साठी यंदाचे घोषवाक्य ‘रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायू व्हा’ हे आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईत सन २०२३ पासून आजपर्यंत घरभेटींद्वारे ३० वर्षांवरील २५ लाख व्यक्तींचे उच्च रक्तदाबासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला. ते सर्व उच्च रक्तदाबावर उपचार घेत होते. तसेच सन २०२२ पासून सुरू केलेल्या २५ तपासणी केंद्रात ४ लाख ९२ हजार रुग्णांची उच्च रक्तदाबाची तपासणी केली आहे.
आजमितीस १ लाख १६ हजार रुग्ण महानगरपालिकेच्या विविध दवाखाने, रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उच्च रक्तदाबामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे पक्षाघात, हृदयाचे विकार, किडनीचे आजार, नेत्र विकार इत्यादी. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रतिदिन ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्य धोक्यात येते. मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या सर्वेनुसार, मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मिठाचे सेवन करतात. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे. विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मिठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब व हृदयविकार आदी आजार होण्याचा धोका कमी करता येतो. जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेतर्फे ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियान (हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा) मे २०२५ दरम्यान राबविण्यात येत आहे. मुंबईकरांमध्ये आहारातील मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याची सवय निर्माण करणे. पदार्थांचे आवरण (फूड लेबल) वाचण्याची सवय लावून सूचित आहार निवडीसाठी प्रवृत्त करणे, तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचे मर्यादित सेवन करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हे या जनजागृती मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. उच्च रक्तदाब दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन रक्तदाबाची तपासणी करावी, नियमित औषधोपचार घ्यावा, दैनंदिन जीवनात मिठाचे प्रमाण कमी करावे, योगा, व्यायाम करावा, तसेच आहारात यथाचित बदल करावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.