Saturday, May 17, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Health: हाय बीपीमुळे तरुणांमध्ये वाढतोय स्ट्रोकचा धोका

Health: हाय बीपीमुळे तरुणांमध्ये वाढतोय स्ट्रोकचा धोका

मुंबई: बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, धुम्रपान आणि दारूचे सेवन यामुळे सध्या २२ ते ३० वयोगटातील २५% तरुर्णामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येत आहे. जागितक उच्चदाब दिनाच्या निमित्ताने या समस्येचं गांभीर्य लक्षात घेणे गरजेचं आहे. उच्च रक्तदाबामुळे तरुणांमध्ये कमी वयात स्ट्रोक, हृदयविकार आणि मूत्रपिंडाशी संबंधीत समस्या होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित चाचणी, संतुलित आहार, व्यायाम करणं गरजेचं आहे.


बऱ्याचदा कोणत्याही लक्षणांशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या विकसित होते, म्हणूनच त्याला "सायलेंट किलर" म्हणून संबोधले जाते. डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे किंवा थकवा ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु, उच्च रक्तदाबाबद्दल वेळीच निदान न झाल्यानं गुतांगुत वाढते. लीलावती रुग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सी. सी. नायर म्हणाले की, तणाव, करिअर संबंधीत वाढती स्पर्धा आणि वैयक्तिक आव्हानं, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या सवयीसह तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढत आहेत. त्याहूनही एक चिंताजनक बाब म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या अनेक तरुणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.


जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही तर, कालांतराने तो इतर अवयवांवर परिणाम करू शकतो. तरुणांमधील उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदयरोग, स्ट्रोक, दुष्टी कमजोर होणे आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. दर महिन्याला उपचारासाठी येणाऱ्या १० पैकी ८ तरूण रूग्णांना ताणतणाव किंवा धूम्रपानामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचं आढळून येत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठाचे सेवन मयांदित करणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे, धूम्रपान तसेच मद्यपानाचे व्यसन सोडणे, नियमित व्यायाम करणे आणि योगा आणि मेडिटेशन सारख्या पर्यायाने तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment