Saturday, May 17, 2025

रिलॅक्स

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सर्वांनाच आठवतात

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सर्वांनाच आठवतात

टर्निग पॉइंट : युवराज अवसरमल




साजिरी जोशी


अभिनेत्री ऋजुता देशमुखची कन्या साजिरीचा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट असल्याने ती खूपच उत्साही झालेली आहे. साजिरीचे बालपण परळमधील आंबेकर नगरमध्ये गेले. आंबेकर नगरमधील गणेशोत्सवामध्ये तिने कविता सादर केल्या होत्या. तिचे शालेय शिक्षण जे. बी. वाछा हायस्कूल (फाइव गार्डन)मध्ये झाले. नृत्यांगना सोनिया परचुरेंकडून तिने कथ्थक नृत्याचे धडे घेतले. साठे कॉलेजमधून तिचे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण झाले, तर पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले. कला शाखेतून फिलॉसॉफीची डिग्री तिने घेतली. रुईयाच्या उत्सव आरोहणमध्ये तिने भाग घेतला होता. नंतर तिने रुईया नाट्यवलयमध्ये काम केले. पदवीच्या शेवटच्या वर्षी तिला दिगदर्शक रोहन मापुस्करांचा ऑडिशनसाठी कॉल आला व तिला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरेल असं तिला वाटते. शूटिंग पूर्वी त्यांनी चित्रपटाच्या कथेवर, पात्रांविषयी चर्चा केली. सेटवर फार कमी वेळात साऱ्यांनी जास्त काम केले.


साजिरीला तिच्या भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली की या चित्रपटामध्ये जाई हे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. उन्हाळी सुट्टी प्रत्येकाला आवडते. अगदी मोठी माणसे देखील उन्हाळी सुट्टी आठवून सुखावून जातात. जाई तिची उन्हाळी सुट्टी मित्रांसोबत कशी घालवते हे या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी करणारी ठरणार आहे. जाई ही थोडी सकारात्मक, मनमिळावू आहे. उन्हाळी सुट्टी मस्त घालवायला ती मित्रांसोबत आलेली आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांनी सर्व कलाकारांसोबत शूटिंग अगोदर चर्चा केली. सगळ्यांना हा चित्रपट आपला आहे याची जाणीव करून दिली. त्यांच्या प्रेरणेने सर्व कलाकारांनी खूप चांगले काम केलेले आहे. सेटवर साऱ्यांची त्यांनी काळजी घेतली.


या चित्रपटाचे शूटिंग श्रीवर्धन, कोकणामध्ये झाले. या चित्रपटामध्ये गाणी खूप चांगली झालेली आहेत. कृष्णा, सिद्धेश, प्रकाश या साऱ्यांसोबत तिची शूटिंगच्या वेळी गट्टी जमलेली होती. शीतल तळपदे व अनिल बांदिवडेकर यांनी तिला एकांकिकेमध्ये घेतले होते. त्यामुळे तिला अभिनय कसा करायचा हे कळले. ए.आई. नावाची एकांकिका होती. एबीपी माझा वाहिनीवरील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित मन शुद्ध तुझं मालिकेमध्ये देखील साजिरीला अभिनय करण्याची संधी मिळाली.


आई, बाबा व आजी, आजोबा यांचा तिला या क्षेत्रात आल्याबद्दल पूर्ण पाठिंबा आहे. तू उन्हाळी सुट्टी कशी घालवायची असे विचारले असता ती म्हणाली की मी पुण्यात आजी आजोबांकडे उन्हाळी सुट्टी घालवायला जायचे. पुण्यात गेल्यावर एक वेगळी मजा यायची. एकत्र जेवण, एकत्र सिनेमा पाहायला जाण व्हायचं. बाहेर एखाद्या ठिकाणी फिरणं व्हायचं. आजी मला पेप्सी, कोला आणून द्यायची. वाचन, नृत्य, पोहणे हे तिचे छंद आहेत. दाक्षिणात्य चित्रपट पाहायला, त्यातील व्यक्तिरेखेचा अभ्यास करायला तिला आवडते. दाक्षिणात्य चित्रपट करायला देखील तिला आवडेल. सेल्फी नाटकातील तिच्या आईची भूमिका तिला आज देखील आठवते. ‘एप्रिल मे ९९’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment