Friday, May 16, 2025

तात्पर्य

कोकणातली शेणाची गायरी

कोकणातली शेणाची गायरी

रवींद्र तांबे


आपल्या देशात बैल, गाय, रेडा आणि म्हैस या पाळीव जनावरांच्या विष्ठेला शेण असे म्हणतात. शेतकरी या शेणाचा वापर शेतात खत म्हणून करतात. हे नैसर्गिकरीत्या मिळालेले खत शेतीला पोषक असते. त्यासाठी किमान सहा महिने शेण कुजवून ठेवावे लागते. यासाठी शेतकरी गोठ्याच्या बाजूला किमान चार ते पाच फुट खोल व सहा ते सात फुट रुंद आकाराचे खोदकाम करून खड्डा खोदला जातो. त्याला सभोवतारी मातीचा एक फुटाचा बंधारा बांधला जात असे जेणे करून पावसाळ्यात आत पाणी जाणार नाही. यालाच कोकणात ‘शेणाची गायरी’ असे म्हटले जाते.


कदाचित शेणाची गायरी म्हटल्यामुळे तरुणाईला प्रश्न पडला असेल? परंतु कोकणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घराच्या शेजारी असलेल्या गोठयाच्या बाजूला पावसाळ्यामध्ये शेण साठवण्यासाठी गायरी असते. साठविलेले शेण शेतात खत म्हणून शेतकरी त्याचा वापर करत असतात. यामुळे शेतीचे उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी होते. आम्ही शेती करीत असताना सर्रास शेणाचाच जास्त प्रमाणात वापर करीत असू. अलीकडे शेतकऱ्यांना बैल जोडी पाळणे सुद्धा खर्चिक व्हायला लागल्यामुळे शेतकरी शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करू लागले. बैलांचा गोठा, त्याची देखभाल, गवत, पाणी याचा खर्च वाढू लागला आणि जंगली प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. ट्रॅक्टर आल्यामुळे शेती कामापुरता ट्रॅक्टरचा वापर करायचा आणि शेतीची कामे झाल्यावर ते घरातील एका कोपऱ्यामध्ये ठेवायचे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्याला स्वतंत्र गोठा, गवत पाणी किंवा रानावनात घेऊन जाणे येणे या सगळ्या ऑटोमॅटिकली सेवा बंद झाल्या. त्यामुळे शेतकरी वर्ग इतर ठिकाणी कामासाठी जाऊ लागला. याचा परिणाम गोठ्यात गुरे नसल्यामुळे गायरी ओसाड पडू लागली. आज जरी आपण शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर केला तरी त्यावेळी शेतीमध्ये शेणाचा वापर केला जात असे. शेणामुळे पिकांचे उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी व्हायचे. त्यामुळे शेतकरीराजा समाधानी दिसत होता. आता शेतकऱ्यांची सरकारला पीक कर्ज माफ करण्याची वेळ आली तरी शेतकरी समाधानी दिसत नाही.


कोकणात गायरीतील वाळलेले शेण शेतकरी मे महिन्यामध्ये चाकरमानी गावी आल्यावर आपली मुले, चाकरमान्यांची मुले आणि शेजारी यांना घेऊन टोपलीतून गायरेतील सुखे शेण वाफ्यामध्ये टाकले जात असे. गायरीतील पूर्ण वाळलेले शेण वाफ्यात टाकल्यानंतर गायरी मध्ये पावसाळ्यात शेण साठवण्यासाठी सारखी करावी लागत असे. त्यानंतर त्याचा बारीक खुटा शेतकरी करत असत. त्यावरती घरा शेजारील सुकलेला पालापाचोळा टाकून संध्याकाळच्या वेळी आग लावली जात असे. दुसऱ्या दिवशी झालेली राख झाडूने एकत्र करून ठेवली जायची. त्यामुळे जमीन भुसभुशीत होण्याला मदत होत असते. शेतकरी बैलांची आणि आपल्या मुला-बाळांची काळजी घेत असे तशी काळजी शेतकरी पावसाळ्यात गायरीची घेत असत. बैलांच्या पायाखाली तुडवलेले गवत एकत्र करून गायरीच्या कठड्यावरती ठेवत असतात जेणेकरून तो कठडा झिजू नये ही शेतकऱ्याची मूळ कल्पना असे. मग उन्हाळ्यामध्ये हे वाळलेले शेण शेतजमिनीत टाकायचे. अशा या नैसर्गिक खतामुळे शेतीची लागवड पण उत्तम प्रकारे व्हायची. शेतकऱ्याला चार गोटे सुद्धा जास्त मिळायचे. त्यासाठी मेहनतही खूप शेतकऱ्यांना घ्यावी लागायची. आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. बैलच नाहीत गोठ्यात, मग गायरीत शेण कसे साठवले जाणार. बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात गायरीच्या आजूबाजूची माती जाऊन गायऱ्या बुजून गेल्या आहेत, तर काही ठिकाणी शेणाऐवजी पावसाळ्यात घराभोवती असणारा पालापाचोरा व घरातील कचरा साठविण्यासाठी गायरीचा नागरिक वापर करू लागले आहेत. त्यामुळे गायरीतील कुजलेला पालापाचोरा खणून झाडांना भर घालताना नागरिक दिसत आहेत. काही लोकांनी त्या गायरीमध्ये एक-दोन माडाची रोपे लावलेली दिसतात मात्र ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती पाहता शेती जरी केली तरी जंगली प्राण्यांच्या संकटामुळे शेती करणे अवघड झाले आहे. बऱ्याच प्रमाणात जंगली प्राणी शेतीचे नुकसान करतात. त्यामुळे शेती उत्पादनाचा आपण विचार केला, तर उत्पादनापेक्षा खर्च जास्त येतो त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करणेही सोडून दिले आहे. कुठेतरी मोलमजुरी करणे, एखाद्या कंपनीमध्ये कामाला जाणे हे शक्य झाल नाही, तर घर बंद करून शहरांमध्ये जाऊन पोटापुरती नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या अनेक गावातील घरे बंद असताना दिसतात. आता जर तरुण पिढीला विचारले तुला शेणाची गायरी माहिती आहे का? तर ते म्हणतील आम्हाला गायरी म्हणजे काय याचीच कल्पना नाही. आम्ही गायरीच पाहिली नाही. मग आम्ही गायरी कशी काय सांगणार तेव्हा गायरीचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल, तर गुरे पाळली पाहिजेत. त्यासाठी शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे. शेतीला अनुसरून जोडधंदे देता आले पाहिजेत. जरी शेतीमध्ये नुकसान झाले तरी जोडधंद्यामुळे त्याला त्याची उणीव भासणार नाही. गुरांना पण शासन पातळीवर योग्य तो आधार दिला पाहिजे.


आज खेडोपाडी पाहिल्यास ज्या जमीन सुपीक दिसत होत्या त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी असताना दिसतात. विकासाच्या नावाखाली काही शेतकऱ्यांनी आपल्याला दोन पैसे मिळतील म्हणून पैशांच्या लोभापोटी अगदी कमी किमतीमध्ये आपल्या जमिनी विकल्या. मात्र आज सोन्यापेक्षाही जास्त भाव जमिनीचा झाला आहे. सन १९९० मध्ये रुपये दोन हजार गुंठा होता तोच आज रुपये पंचवीस लाख गुंठा झाला आहे. यामध्ये सर्वात मोठा धोका निर्माण झाला तो म्हणजे शेतकरी वर्गाने भविष्याचा विचार न करता रोखीने व्यवहार करून जमिनी विकून टाकल्या यात काही शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी सुद्धा विकून टाकली. आज घर आहे. घराच्या बाजूला मोडकळीत आलेला गोठा आहे. गोठ्याच्या बाजूला पूर्ण बुजलेली गायरी आहे. मात्र गायरीचे अस्तित्व शिल्लक राहिले नाही. तेव्हा आता गायरीचे अस्तित्व राहायला हवे, तर शेतकरी आता शेतीकडे वळायला पाहिजेत. ट्रॅक्टर सोडून बैल जोडी घेतली पाहिजे, तरच शेणाच्या गायरीचे अस्तित्त्व अबाधित राहील.

Comments
Add Comment