
महान क्रिकेटपटू विक्रमवीर सुनील गावसकर, विक्रमादित्य सचिन तेडुलकर यांच्यानंतर कसोटी क्रिकेट प्रकारांमध्ये छाप पाडणारा मुंबईचा आणखी एक सर्वोत्तम फलंदाज रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. ३८ वर्षांच्या फलंदाजाकडून आणखी काही वर्षे खेळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याने अचानक पारंपरिक कसोटी क्रिकेटमधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. मुंबई क्रिकेटने देशाला अनेक जगविख्यात फलंदाज दिलेत. त्यामुळे गावसकर किंवा तेडुलकर यांच्यानंतर कोण, असा प्रश्न पडलाच नाही. सचिननंतर रोहितने हा प्रश्न निकाली काढला. जवळपास १७ वर्षांच्या कारकिर्दीत तो ११ वर्षेच कसोटी क्रिकेट खेळला. २३ जून २००७ मध्ये एकदिवसीय सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा करणारा रोहित पहिला कसोटी सामना ६ ऑगस्ट २०१३मध्ये खेळला. झटपट क्रिकेटमध्ये तुफानी फटकेबाजी करणारा हा मुंबईकर फलंदाज पाच दिवसांच्या पारंपरिक क्रिकेटच्या साचेबद्ध खेळासाठी सूट होईल का, अशी भीती बीसीसीआयच्या तत्कालीन निवडसमितीला वाटली असावी. त्यामुळे कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी रोहितला कसोटी पदार्पणासाठी मोठी वाट पाहावी लागली. मात्र, फॉरमॅट कुठलेही असो, त्याने आपला क्लास दाखवून दिला. २०१३मधील वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याद्वारे रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ पाऊल ठेवले नाही, तर मैदान गाजवून सोडले. पदार्पणात १७७ धावांची खेळी करत आपल्या आगमनाची घोषणा केली.
जवळजवळ सहा वर्षे, रोहितने मधल्या फळीत फलंदाजी केली आणि वेळोवेळी चमकदार कामगिरी करूनही सातत्य राखण्यासाठी संघर्ष केला. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला डावाची सुरुवात करण्यासाठी बढती देण्यात आली ज्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीत एक वेगळाच बदल झाला. सलामीवीर म्हणून त्याच्या पहिल्याच कसोटी मालिकेत, रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये एक द्विशतक आणि दोन शतके झळकावत संघातील स्थान पक्के केले. ११ वर्षांच्या कारकिर्दीत रोहितच्या नावावर ६८ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा आहेत. त्याने १२ कसोटी शतके झळकावली असून १८ अर्धशतकांचादेखील यात समावेश आहे. वनडे आणि टी-२० कारकिर्दीसोबत पारंपरिक कसोटी क्रिकेट खेळायला मिळाले असते, तर रोहितच्या खात्यात दुप्पट धावा आणि शतकांची भर पडली असती. सर्वोत्तम फलंदाज हा यशस्वी कर्णधार होऊ शकतो, हे रोहितने दाखवून दिले. माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी याच्यानंतर त्याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे पेलली. रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली भारताने २४ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने जिंकले. यात घरच्या मैदानावरील १० सामन्यांचा समावेश आहे. विजयाची ही टक्केवारी त्याच्या कुशल नेतृत्वाची पोचपावती आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात रोहितने भारताचे नेतृत्व केले.
चाळीशीच्या घरात असलेल्या रोहितला गेल्या वर्षभरात अपेक्षित फलंदाजी करता आली नव्हती. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची शेवटची मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर मालिका वगळता फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याची कामगिरी खराब राहिली. रोहितने आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतके ठोकून त्याचा फॉर्म मिळवला आहे. एक अनुभवी खेळाडू आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्याचा आगामी इंग्लंड दौऱ्यावर त्याचा भारताच्या संघात समावेश व्हायला हरकत नव्हती. मात्र, विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर यांची नवा कसोटी संघ तयार करण्याची प्रक्रिया पाहता आणि काळाची पुढील पावले ओळखून रोहितने सन्मानाने निवृत्तीचा निर्णय घेतला. काहींच्या मते, प्रशिक्षक गंभीर यांना सीनियर्सचे वावडे आहे. संघ निवडताना राष्ट्रीय निवड समितीला प्रशिक्षकांचे म्हणणे जाणून घ्यावे लागते. भारतामध्ये गुणवत्तेला तोड नाही. सध्या राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. मात्र, गावस्कर, कपिल देव, दिलीप वेगसरकर, रवी शास्त्री, सौरव गांगुली, तेडुलकर, महेद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू अभावाने लाभतात. या आणि अशा अनेक महान खेळाडूंनी जगभरात तिरंगा डौलाने फडकावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी-२० हे तीन प्रकार आहेत. रोहितने वर्षभराच्या फरकाने टी-२० आणि कसोटी प्रकारातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आता तो केवळ एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसेल. याशिवाय रोहित आयपीएलमध्येही सहभागी होईल. मात्र, वनडे संघातील निवडीसाठी बीसीसीआयची निवडसमिती आणि आयपीएलसाठी संघमालकांच्या इच्छेवर त्याचा सहभाग अवलंबून आहे. वनडे, टी-२० किंवा कसोटी प्रकार असो, खराब चेडूला जोराने फटकावणे, हे रोहितच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य. म्हणून त्याला 'हिटमन' ही उपाधी मिळाली. त्याच्यासारख्या चौफेर फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजामुळे पारंपरिक कसोटी क्रिकेट वेगवान झाले. एका दिवसात ३०० धावा फलकावर लागल्या. त्यामुळे मुंबई, भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना रोहितच्या निवृत्तीच्या निर्णयाने धक्का बसला आहे. तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी क्रीडा क्षेत्रात एका विशिष्ट टप्प्यावर थांबावे लागते. वाढते वयोमान असो किंवा तुमचा फॉर्म अशी काही प्रमुख कारणे त्यामागे असतात. मात्र, शेवटचा सामना खेळून रिटायर होण्याचा आनंद वेगळा असतो. महेद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल, प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासह कुशल नेतृत्व करणाऱ्या रोहितच्या वाट्याला तसा क्षण आला नाही, याची सल मनात कायम राहणार, हे निश्चित.