
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात ६ मे २०२५ पासून ते १६ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. शेतकरी वर्गाने पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांना सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण जून महिन्यात पडणारा पाऊस आता मे महिन्यात पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपापल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टर व जेसेबी द्वारे करताना दिसत आहे; परंतु हा मे महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस शेतकरी वर्गांना जूनमध्ये भात पेरणी हंगामात दगा देतो की काय अशी चर्चा वयोवृद्ध शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे जून महिन्याऐवजी ऐन मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटत आहे.
कारण मे महिन्यासारख्या कडक उन्हाळ्यात पाऊस कदाचित एकदा किंवा दोनदा पडतो; परंतु यंदा मे महिन्यात दहा ते अकरा दिवस पाऊस पडताना दिसत आहे. अशा अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे रानमाळावर गवत उगवू लागले आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस कसा पडणार या भीतीपोटी शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात हवेतील गारवा जाणवतो परंतु सकाळी व दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवते.