
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप
नवी दिल्ली : हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह ६ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याशी झालेल्या भेटीप्रकरणी ज्योती मल्होत्राला आज, शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने ज्योतीला ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
यासंदर्भातील माहितीनुसार, पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेला पाकिस्तानी कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याने ज्योती मल्होत्राला जेवणासाठी आमंत्रित केले होते. यावेळी, दोघांमध्ये संभाषण झाले आणि युट्यूबरने त्याच्यासोबत एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. नंतर, दानिश आणि त्याचा मित्र अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी (पीआयओ) करून दिली. ज्योतीने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड ऍप्सवर 'जट्ट रंधावा' नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर शाकीर उर्फ राणा शाहबाजशी संवाद साधला. ज्योतीवर भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम १५२ आणि अधिकृत गुपिते कायदा, १९२३ च्या कलम ३, ४, आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिचा लेखी कबुलीजबाब घेऊन प्रकरण हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. एहसान उर रहीम उर्फ दानिश भारतात राहून भारताविरुद्ध कट रचत होता. ही बैठक गंभीर असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानला मदत करणाऱ्या तेरा जणांना देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. यात सहा यू ट्युबर आणि सात ओटीपी घोटाळेबाज यांचा समावेश ...
ज्योती यूट्यूबवर 'ट्रॅव्हल विथ जो' हे चॅनल चालवत असून तिचे सुमारे ३.७७ लाख सबस्क्राइबर आहेत. तसेच 'travelwithjo1' या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.३२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्योतीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून असे दिसून येते की तिने भारताबाहेर इंडोनेशिया आणि चीनसह अनेक देशांना भेट दिली आहे. पण एजन्सी तिच्या पाकिस्तान भेटीवर लक्ष ठेवून आहेत, ज्याचा व्हिडिओ तिने 2 महिन्यांपूर्वी पोस्ट केला होता. या व्हिडिओंमध्ये, ज्योती अटारी-वाघा सीमा ओलांडताना, लाहोरच्या अनारकली बाजारात फिरताना, बसने प्रवास करताना आणि पाकिस्तानातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कटासराज मंदिराला भेट देताना दिसत आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ज्योतीच्या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर मल्होत्रा २०२३ मध्ये पाकिस्तानला गेली होती. भेटीदरम्यान, ती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात (पीएचसी) तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात आली. त्यानंतर एहसानने ज्योतिची ओळख पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. या महिन्याच्या सुरुवातीला एहसानला पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आणि १३ मे रोजी त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.
सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखविण्याचे काम ज्योती मल्होत्रा करायची
एका पीआयओशी जवळचे संबंध निर्माण झाले आणि अलिकडेच इंडोनेशियातील बाली येथे एकत्र प्रवास केला होता. ज्योतीने भारतीय ठिकाणांबद्दल संवेदनशील माहिती शेअर केली आणि दिल्लीत असताना ती दानिशच्या संपर्कात होती. ज्योतीने गुप्तचर आणि प्रचार कार्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केला. एकूण हे प्रकरण एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे ज्यामध्ये ज्योतीसह ६ भारतीय नागरिक पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि उच्चायोग कर्मचाऱ्यांसाठी एजंट किंवा सहाय्यक म्हणून काम करताना आढळले आहेत. हरियाणातील हिसार, कैथल, नूह आणि पंजाबमधील मालेरकोटला येथून अटक करण्यात आली. यामध्ये गजाला नामक महिला, यामिन मोहम्मद यांना आर्थिक व्यवहार आणि व्हिसा प्रक्रियेत मदत केल्याबद्दल अटक करण्यात आलीय. तसेच देवेंदर सिंग ढिल्लन याला पटियाला छावणीचा व्हिडीओ पाकिस्तानला पाठल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. तसेच अरमान नामक तरुणाला गुप्तचार कारवाया आणि निधी हस्तांतरणासाठी भारतीय सिम कार्ड पुरवल्याबद्दल अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सुरक्षा संस्था नेटवर्कच्या इतर भागांचीही चौकशी करत आहेत.