
मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रतिबंधीत आयएसआयएस संघटनेच्या 2 फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी यांची नावे आहेत. अब्दुल्ला आणि तल्हा पुणे येथे आयईडी बनवण्याच्या आणि चाचणीशी संबंधित प्रकरणातील आरोपी आहेत.
अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान यांना इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरून अटक केली आहे. दोन्ही आरोपी गेल्या 2 वर्षांपासून फरार होते. दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर एनआयएच्या पथकाने त्यांना अटक केली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. एनआयएने दोन्ही आरोपींबद्दल माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. दोघांविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत, पुणे स्लीपर मॉड्यूलच्या इतर ८ सदस्यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
एनआयएने सांगितले की, या दोघांसह आधीच अटक केलेल्या इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे लोक पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फयाज शेख यांनी भाड्याने घेतलेल्या घरात आयईडी तयार करण्यात गुंतले होते. अब्दुल्ला फयाज शेख आणि तलहा खान यांच्या व्यतिरिक्त मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, आकीफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.