
राजरंग : राज चिंचणकर
रंगमंचावरचा पडदा उघडतो आणि नाट्यावकाशात नाटक फेर धरू लागते. समोर दिसणारे नेपथ्य, प्रकाश आणि त्या माध्यमातून कलाकारांच्या होणाऱ्या ‘एन्ट्री’ नाटक रंगण्याची हमी देत, रंगभूमीवरचा खेळ सुरू करतात. नाटकाच्या खेळाला ‘प्रयोग’ म्हटले जाते; कारण प्रत्येकवेळी हा खेळ तितक्याच ताकदीने, नव्याने खेळला जातो. नाटक सुरू झाल्यावर त्यात भूमिका करणारे मुख्य कलावंत नाटकाचा ताबा घेतात आणि रसिकही त्यांच्या मायाजालात गुंतत जातात. अर्थात नाटकाच्या यशस्वीतेसाठी हे आवश्यक असले, तरी मुख्य कलाकारांसह नाटकातले सहकलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागचे कलावंत प्रत्येक नाटकात, किंबहुना प्रत्येक नाटक उभे करण्यात महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. अलीकडे व्यावसायिक रंगभूमीची बदललेली गणिते लक्षात घेता, आजकाल कमीत कमी कलावंतांना घेऊन रंगभूमीवर नाटक आणले जाते. अर्थात यात निर्मात्याची भूमिका आणि कलाकारांची इतरत्र असलेली व्यस्तता महत्त्वाची ठरते. नाटक जेव्हा निर्मितीवस्थेत असते, तेव्हा इतर सर्व घटकांची बहुमोल साथ नाट्यनिर्मितीत लाभत असते; परंतु असे असले तरी ही सर्व मेहनत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कलावंतांच्या माध्यमातून होत असल्याने, कलाकारांना ती धुरा सांभाळावी लागते आणि ताकदीने नाटक रसिकांपर्यंत पोहोचवावे लागते. सध्या कमीत कमी कलाकार घेऊन नाटक करणे फायदेशीर ठरत असतानाच, ‘गंगा, यमुना, सरस्वती’ या नाटकाने मात्र तब्बल १४ कलाकारांचा चमू रंगमंचावर उतरवला आहे. अलीकडेच शुभारंभ झालेल्या या नाटकात इतक्या कलाकारांची मोट बांधण्याचे कार्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले आहे. सध्याच्या काळातली नाटकाची एकंदर गणिते सोडवत ‘कलाविहार नाट्यमंडळ, पुणे’ ही संस्था या नाटकाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. या नाटकात मुख्य तीन कलाकारांसह अजून अकरा कलावंत भूमिका साकारत आहेत. या सर्वांचे टीमवर्क या नाटकासाठी महत्त्वाचे आहे. या नाटकात रसिका वेंगुर्लेकर हिच्या विविधरंगी भूमिका आहेत; तर या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी बाळ धुरी तब्बल २१ वर्षानंतर रंगभूमीवर काम करत आहेत. त्यांच्या जोडीला सुनील जाधव यांची महत्त्वाची भूमिका नाटकात आहे.
या तीन मुख्य कलावंतांसह नाटकात असलेले अकरा सहकलाकार या नाटकाचे आधारस्तंभ आहेत. नाटक, मालिका व चित्रपटांतून विविध भूमिका साकारणारे गणेश रेवडेकर, दुर्गेश आकेरकर व संदेश अहिरे हे तीन अनुभवी कलावंत या नाटकाचा अविभाज्य भाग आहेत. या मंडळींसह प्रभाकर वर्तक, भक्ती शेठ, धनश्री पाटील, ऋतिका चाळके, श्लोक राणे, प्रतिभा वाले, अविनाश कांबळे व दीपक जाधव या कलाकारांनी यातल्या ‘गंगा, यमुना, सरस्वती’ला भक्कम साथ दिली आहे. सहकलाकारांचा आविष्कार हा या नाटकासाठी महत्त्वाचा आहे. या नाटकातल्या १४ कलाकारांनी मिळून एकूण २४ भूमिका रंगमंचावर साकारल्या आहेत. या नाटकाच्या निमित्ताने सहकलाकारांचे नाटकातले योगदान अधोरेखित झाले असून, हे नाटक रसिकांपर्यंत उत्तमरीत्या पोहोचावे यासाठी १४ कलाकारांच्या या टीमचा प्रयत्न दखल घेण्याजोगा ठरला आहे. नाटकात असलेल्या १४ कलावंतांच्या चमूबद्दल बोलताना दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे म्हणतात, “हल्ली कमी कलाकार घेऊन नाटक करण्यास प्राधान्य दिले जाते.
अर्थात यामागे अनेक गोष्टी असतात. पण आमच्या नाटकात मात्र १४ कलावंत आहेत आणि या सर्व कलाकारांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. आजपर्यंतच्या माझ्या नाटकांच्या बाबतीत म्हणाल, तर माझ्या सगळ्याच नाटकांमध्ये अनेक कलावंत असतात. किंबहुना, बरेच कलावंत असलेली नाटकेच मी करत आलो आहे. ‘गंगा, यमुना, सरस्वती’ हे नाटक सुद्धा त्याला अपवाद ठरलेले नाही”.