Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

मुंबईत १३४ खासगी इमारती धोकादायक

मुंबईत १३४ खासगी इमारती धोकादायक

गोरेगावसह वांद्रे पश्चिम परिसरात सर्वाधिक इमारती

मुंबई : मुंबई महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. मुंबईत एकूण १३४ अतिधोकादायक खासगी इमारती आहेत. यामध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक इमारती आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती गोरेगाव आणि वांद्रे पश्चिम परिसरात आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे मुंबईतील खासगी धोकादायक इमारतींची संख्या कमी होऊ लागली आहे.

मुंबईत एकेकाळी धोकादायक इमारतींची संख्या मोठी होती. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक इमारत पडून दुर्घटना होण्याचे प्रमाणही अधिक होते. काही वर्षांपूर्वी पालिकेने धोकादायक इमारती पाडून टाकण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती हाती घेतली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईला यश येत असून मुंबईत सध्या केवळ १३४ धोकादायक इमारती उरल्याचा दावा पालिका प्रशासनाने आकडेवारीद्वारे केला आहे. दरम्यान, मुंबईतील १३४ धोकादायक इमारतींपैकी ५६ इमारतींची प्रकरणे न्यायालयात आहेत, तर १२ इमारतींच्या संरचनात्मक अहवालाबाबत रहिवाशांचे आक्षेप असल्यामुळे या इमारतींचे अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे आहेत. त्यामुळे या १३४ इमारतींपैकी ७७ धोकादायक इमारतीत अद्याप रहिवाशांचे वास्तव्य आहे. या धोकादायक इमारती रिकाम्या करून पाडून टाकणे हे पालिकेपुढचे मोठे आव्हान आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील खासगी इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. तत्काळ पाडून टाकणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक इमारती सी वन श्रेणीत समाविष्ट करण्यात येतात. अशा इमारतींची यादी मुंबई महापालिकेतर्फे जाहीर केली जाते. त्यापैकी काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. दरवर्षी यापैकी काही इमारती पाडून टाकल्या जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या धोकादायक इमारतींची संख्या कमी होत आहे.

पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात धोकादायक आढळणाऱ्या इमारतींमधील घरे रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली जाते. इमारत धोकादायक ठरवण्याबाबत रहिवाशांचे काही आक्षेप असल्यास ते न्यायालयात किंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल, तर ते पालिकेच्या तांत्रिक समितीकडे धाव घेतात. त्यामुळे त्या इमारती पाडता येत नाहीत. तसेच एखाद्या इमारतीच्याबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिला तरी ती इमारत पाडून टाकता येत नाही.

...या परिसरात एकही धोकादायक इमारत नाही परळ, शिवडी, नायगाव, बोरिवली या भागात एकही धोकादायक इमारत नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने आकडेवारीतून केला आहे, तर गिरगाव, चर्नीरोड, मानखुर्द, गोवंडी भागात प्रत्येकी एक इमारत धोकादायक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीत म्हटले आहे.

Comments
Add Comment