
मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्याचा समितीने दिला इशारा…
सफाळे : पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्रमांक ४२ कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवार १३ मे २०२५ पासून सफाळे विकास कृती समितीच्यावतीने समितीचे मंगेश घरत हे या उपोषणात सहभागी झाले होते. या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस असताना खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून पर्यायी व्यवस्थेसंदर्भात काही आश्वासने दिल्यानंतर उपोषणकर्ते यांनी आंदोलनास तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र दिलेल्या वेळेत मागण्यापूर्ण न केल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल असा इशाराही कृती समितीकडून देण्यात आला.
सफाळे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ नये यासाठी कृती समितीच्या वतीने वेळोवेळी रेल्वे प्रशासन, स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या मांडण्यात आल्या. मात्र त्यावर फक्त आश्वासनांची उधळण झाली असून, प्रत्यक्ष कृती काहीच झालेली नव्हती.
त्यामुळे ०४ एप्रिल २०२५ रोजी फाटक बंदीच्या विरोधात कृती समितीने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि डीआरएम यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या समवेत बैठक घेतली होती. परंतु या बैठकीनंतरही प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच अन्यायग्रस्त नागरिकांसाठी समितीने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता. सलग चार दिवस चालणाऱ्या या आंदोलनास नागरिकांनी वाढता प्रतिसाद दिला होता. तर खासदार सवरा यांच्या आश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत, कृती समितीचे अध्यक्ष सिकंदर शेख, उपाध्यक्ष नचिकेत पाटील, सचिव स्वप्निल तरे, संतोष घरत यांच्यासह पश्चिम भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच आणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनामुळे मिळालेल्या सुविधा
१. फाटक लगत पूर्व पश्चिम भुयारी मार्ग पादचाऱ्यासाठी (प्रशासकीय गोष्टी सुरुवात ) टाइमलाइन काही दिवसांत जाहीर होईल.
२. पूर्वेला प्रवाशांसाठी लिफ्टचे काम त्वरित चालू करून सप्टेंबर महिन्यात चालू करणार.
३. पूर्वेला जिल्हापरिषदच्या जागेचे हस्तांतरणाचा विषय झाला की लगेच सरकता जिना चालू करणार.
४. पश्चिमेला रेल्वे प्लेटफॉर्मवर सरकता जिना जुलै महिन्यात चालू करणार.
५. पालघर बाजूला एकदम टोकाला बनवायला लावलेला फूट ओवर ब्रिज फाटका बाजूला सरकवण्यासाठी जागेची तपासणी करणार.
६. काही गोष्टींमध्ये प्रवाशांना त्रास होणार नाही म्हणून शिथिलता आणली जाणार.