
भालचंद्र कुबल : पाचवा वेद
आमची पिढी दिलीप कोल्हटकर, विनय आपटे, प्रकाश बुद्धीसागर, कमलाकर सारंग, कुमार सोहोनी, सतीश पुळेकर इत्यादी दिग्दर्शकांनी गाजवलेल्या नाटकांच्या अंगाखांद्यांवर खेळत खेळत तयार झाली. त्यात महत्त्वाचं नाव होतं पुरुषोत्तम बेर्डे. नाट्यस्पर्धा हा हौशी आणि व्यावसायिक रंगकर्मींना जोडणारा ब्रीज होता, दुवा होता, सांधा होता. त्यामुळेच ही मंडळी आमच्यापर्यंत किंबहूना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. मी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना आमच्या सिनियर्सनी “ या मंडळी सादर करूया” या संस्थेमार्फत सादर केलेली नाटके असोत वा व्यावसायिक रंगभूमीवर धुमाकूळ घालणारे “टुरटूर”, पुरू बेर्डे नामक फॅन क्लबचे आम्ही सदस्य होतो आणि राहू...! म्हणजे, केवळ एक इन्फो म्हणून द्यायची झाल्यास घरात घुसले सारे किंवा सखी प्रिय सखी सारखी लोकाश्रय न मिळालेली नाटके सुद्धा आम्हाला प्रचंड आवडून गेली होती. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांची वृत्ती आणि कल्पनाशक्ती. ती सृजनात्मक, बेफाम आणि निर्भीड होती. वर नमुद केलेल्या दिग्दर्शकांपैकी आज बरेच जण फोटोमध्ये तरी गेले आहेत किंवा जीवन गौरव घेऊन निवृत्त तरी झालेत. ‘सातत्याने रंगभूमीला काही ना काही देणारा पुरू बेर्डे हा वन आॅफ द लिडिंग दिग्दर्शक केवळ आज उरलाय’ या माझ्या विधानातील सत्यता आजही खरी ठरते. मध्यंतरीच्या काळात त्यांचे चरीत्रनाट्य “पुरुक्रमा” आणि “मु. पो. आडगाव” बघायचे राहून गेले; परंतु “गंगा, यमुना, सरस्वती” आले आणि बघितल्यावर हायसे वाटले.
जे कुणी समीक्षक या नाटकाबद्दल लिहितील ते पणशीकरांच्या “तो मी नव्हेच” या नाटकाच्या उल्लेखाशिवाय पुढे जाऊच शकत नाही व त्यातून मी देखील सुटलेलो नाही. हे देखील “ ती मी नव्हेच” आहे फक्त ती प्रखर अँटॅगॉनिस्ट नसून प्रोटागॉनिस्ट आहे. मला कधी कधी सद्य स्थितीतल्या मराठी लेखकांच्या कल्पक भव्यते विषयी (म्हणायचं होतं भव्य कल्पकतेविषयी) अनेक प्रश्न सतावतात. या नाटकाच्या लेखकांने प्रभाकर पणशीकरांनी अजरामर करून ठेवलेल्या तो मी नव्हेचची पंचवीसावी पुसट झेरॉक्स का बरं माराविशी वाटली असावी? म्हणजे हे नाटक आताच्या पिढीस तो मी नव्हेच हे नाटक काय होते, हे समजावण्याचा प्रयत्न आहे का? की एक नवीन येऊ घातलेली हास्यनटी किती अंगाने पेश होऊ शकते, ते दाखवण्याचा हा फॅब्रिकेटेड पोर्टफोलिओ आहे? म्हणजे माझं डोकं तार्किक असल्यामुळे भंजाळून जाण्यापलीकडे काहीच होत नाही, मग प्रेक्षकांचं काय होत असेल? असो. मोहाडीकरांच्या लेखनाबद्दल मी “अमेरीकन अल्बम” ऊर्फ “तू भेटशी नव्याने” या भाग्यश्री देसाई आणि दीपक करंजीकरांनी तारलेल्या नाटकाबद्दल लरेडी लिहून झालंय. त्यामुळे परत परत त्याच त्याच चुका मी तरी का कराव्यात?, तर पुन्हा असो.
मात्र नाट्य प्रयोगाबाबत अनेक जमेच्या बाजू सांगता येतील. मुळात हे नाटक बघताना ते पूर्ण रिहर्सल आहे हे बघून बरं वाटलं. एखाद दुसरा समन्वय न साधता येण्यासारखी एखादीच मुव्हमेंट सोडली, तर नाटकाचा दुसरा किंवा तिसरा प्रयोग असूनही सादरीकरण चोख होते. सुनील जाधव आणि गणेश रेवडेकर ही खरंतर तयारीची मंडळी, नाटकाचा फ्लो कायम राखतात. बाकी नटांपैकी प्रभाकर वर्तक, संदेश अहिरे, प्रतिभा वाले इत्यादींचे अभिनय प्रयत्नही दुर्लक्षून चालणार नाही कारण त्यांची थिएट्रील प्रोसेस प्रामाणिक आहे. कित्येक वर्षांनी बाळ धुरींना कोर्टातल्या कोटात जजच्या स्थानावर करकरीत आवाजात वाचून दाखवलेली जजमेंट ऐकवताना बघितलं आणि बरं वाटलं. नक्की माहीत नाही; परंतु वय बरंच असणार बाळ धुरींच. या वयातही नाटकात काम करण्याची त्यांची उमेद थक्क करून जाते. नाटकाचा रसिका वेंगुर्लेकर हा मोठ्ठा यू. एस.पी. आहे. आजवर आपण त्याना हास्यजत्रेत आणि त्या देखील आधी काही एकांकिकातून पाहिले आहे. व्यक्तिरेखा ताकदीने उभे करण्याचे सामर्थ्य त्यानी सिद्ध केलेलेच आहे. व्हर्सटाईल कॅटेगरीत नोंद केली जावी अशी ही कलाकार चार भूमिकांमधून या नाटकाला लाभली आहे.
काय आहे, तौलनिक निरीक्षण (कंपॅरिटिव्ह अॅनेलॅसिस) म्हटले की नेपथ्याचा विचार देखील बॅक ऑफ दी माइंड “तो मी नव्हेच” मुळे अपरिहार्य होता. एकूण चार सेट करण्यापेक्षा फिरत्या रंगमंच्याचा सहारा का नाही दिला गेला? या कोड्यात मी अद्याप आहे. नाटक नावाचे माध्यम कधी सिनेमॅटीक झाले ते खरे तर आपल्याला कळले देखील नाही, त्यामुळे फिरता रंगमंच नाटकातल्या सिनेमॅटीकतेला अधोरेखित करणारा डिव्हाईस ठरला असता. बरं गंगा, यमुना, सरस्वती या व्यक्तिरेखांचे सर्व प्रसंग कृतीनिष्ठ असल्याने आधीच रुंदीने अर्ध्या केलेल्या रंगमंच्याचा वापर पुरेपूर होत नाही. बरं त्या प्रसंगात प्राॅपर्टीचा वापरही अत्यल्प असल्याने “ नटांची दमछाक” नामक धोका संभवतो. बेर्डेसरांचं संगीत मात्र कडक. प्रसंग बदलताना पुढल्या प्रसंगाचा फ्लेवर ज्या हळूवारपणे मिक्स करतात त्याला तोड नाही. फक्त त्या “भूमिका” आणि “बावर्ची” मधल्या चिजांचा वापर ठळकपणे व्हावा.
परंतु यात दखल आणि मुलाखत घ्यायचीच झाली, तर मी निर्माते लालासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे यांची नक्की घेईन कारण कोविड पश्च्यात नाट्यव्यवसायाचे गणित पार बिघडून गेलेय. नफ्याची शक्यता पार विस्कटून गेलीय अशा परीस्थितीत चक्क १४/१५ कलाकार असलेल्या नाटकाची निर्मिती करणे म्हणजे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. रसिका वेंगुर्लेकरपासून महत्त्वाचे ४/५ कलाकार तरी सद्या बिझी कॅटेगरीत मोडतात. त्यात दिग्दर्शकही तेवढाच बिझी. हे समीकरण जुळवून आणण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले आहे त्यांना कडक सॅलूट. एकच इच्छा की हे नाटक चालावे... पुढे प्रेक्षक कोणत्या पद्धतीने स्वीकारतात, हा पुढला विषय...!