
७ जूनपर्यंत राबवणार जिल्ह्यांमध्ये मोहीम
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाणी तपासणी जनजागृती अभियानाचा शुभारंभ झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व १ हजार ५३४ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ७ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली. मात्र पाणी तपासणी करताना फक्त मोजक्याच विहिरींचे पाणी तपासले न जाता गावातील न आटणाऱ्या प्रत्येकी ५ विहिरींचे पाणी तपासणी होणे आवश्यक आहे.
पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियाना अंतर्गत रासायनिक व जैविक फिल्ड टेस्टिंग किट संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत. त्या आनुषंगाने दि. १९ ते २३ मे २०२५ या कालावधीत जनजागृती अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर दि. २ जून ते ७ जून २०२५ कालावधीत अभियानाची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. जिल्ह्यातील १५३४ गावामध्ये या अभियानदरम्यान फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करावयाची आहे. स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहे.
या अभियानामध्ये सर्व शासकिय यंत्रणांनी सहभाग घेऊन पाणी गुणवत्ता तपासणी आणि व्यापक जनजागृती करावी असे अवाहन प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी केले. काय आहे क्षेत्रीय तपासणी संच फिल्ड टेस्टिंग किट म्हणजे क्षेत्रीय तपासणी संच हे एक पोर्टेबल उपकरण आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे. यामध्ये पी. एच., क्लोरिन, नायट्रेट्स, फ्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कलिनिटी, गढूळपणा, हार्डनस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या रासायनिक तसेच जैविक घटकांची तपासणी केली जाते. याचा लगेच निकाल (प्राथमिक स्तरावर) मिळतो.
अभियानामध्ये या विभागांचा सहभाग
फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानामध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभागाचा सहभाग राहील. सर्वांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी केली जाणार आहे.