
महानगरपालिकेत विवाह नोंदणी सेवा आता ऑनलाइन
विरार (प्रतिनिधी): वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी विवाह नोंदणी सेवा आता ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वधू किंवा वर पैकी एकजण वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करताना अर्ज इंग्रजी व मराठीत अचूक भरावा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अपलोड करावा. विवाह निंबधकास भेटण्याच्या दिवशी व वेळेस मूळ कागदपत्रे सादर करावीत व कार्यालयास भेट देताना विवाह नोंदणीसाठी वधू, वर व तीन साक्षीदार यांच्यासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
रेशनकार्ड व पासपोर्टवरील पत्ता हे रहिवासाचे प्रमाण म्हणून ग्राह्य धरले जातील, घटस्फोटीत, विधवा/विधुर असल्यास त्यासंबंधीचे अधिकृत दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे. या ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक, वसई-विरार शहर महानगरपालिका यांनी केले आहे.