
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनचा हलगर्जीपणा समोर, फ्राईड राईस आणि न्यूडल्समध्ये निघाले रबर
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील 'Route 93' या चायनीज गाळ्यामध्ये हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असताना हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अनेक ठिकाणाहून शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
सदर घडलेली घटना गांभीर्याने घेऊन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठाकडून समिती स्थापन करत यासंदर्भात चौकशी करण्यात येणार आहे.
यापूर्वीही विद्यापीठाचा गलथान कारभार झाला आहे उघड
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात यापूर्वी ढेकणं आढळून आली होती, त्याचबरोबर जेवणात आळ्या देखील आढळून आल्या होत्या. हे प्रकरण ताजं असतानाच या विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघाल्याने खळबळ उडाली आहे. विद्यापीठात जेवणाच्या बाबतीत वारंवार हलगर्जीपणा समोर आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.