Friday, May 16, 2025

देशब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

पाण्यावरून तापलं राजकारण! सिंधु जल करारावरून उमर अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांच्यात ट्विटर युद्ध, आरोपांच्या फैरी!

पाण्यावरून तापलं राजकारण! सिंधु जल करारावरून उमर अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांच्यात ट्विटर युद्ध, आरोपांच्या फैरी!

महबूबा मुफ्तींच्या 'शांतीवादा'वर उमर अब्दुल्लांचा सणसणीत प्रहार!


श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले आहे. सिंधु जल करारावरून जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यात ट्विटरवर चांगलाच शाब्दिक वाद रंगला आहे. दोघांनीही एकमेकांवर तीव्र आरोप करत, जुन्या राजकीय जखमा उकरून काढल्या आहेत.


वुलर तलावावरच्या टुलबुल नेव्हिगेशन बॅराज प्रकल्पावरून जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. उमर अब्दुल्ला यांनी सिंधु जल कराराच्या स्थगितीचा दाखला देत हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा, असे ठामपणे सांगितले. त्यांच्या मते, १९८०च्या दशकात पाकिस्तानच्या दबावामुळे थांबवलेला हा प्रकल्प आता नव्या जोमात सुरू केला जाऊ शकतो. यामुळे थंडीच्या काळात विजनिर्मिती वाढेल आणि काश्मिरी जनतेच्या हिताला चालना मिळेल.





पण महबूबा मुफ्ती यांनी उमर यांच्या या प्रस्तावावर नाराजी व्यक्त करत ट्विट केले की, "भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर असा प्रस्ताव मांडणं दुर्दैवी आहे. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीचं हत्यारीकरण करणं अमानवी आहे."



या वक्तव्याने उमर भडकले. त्यांनी पलटवार करत महबूबांवर जोरदार टीका केली. "सीमा पार बसलेल्या काही लोकांना खूश करण्यासाठी आणि स्वस्त:त प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही काश्मीरच्या जनतेच्या पाण्याच्या हक्कावर घाला घालता. सिंधु जल संधि हा काश्मीरसाठी ऐतिहासिक विश्वासघात होता. त्याचा विरोध करणे युद्धखोरपणाचे लक्षण नाही, तर अन्यायाविरुद्धचा लढा आहे."


उमर यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही देशाविरुद्ध नाही, तर काश्मीरच्या पाण्याचा, अधिकारांचा आणि स्वाभिमानाचा आहे. महबूबा मुफ्ती शांतीचा मुखवटा घालून जनतेचा हक्क नाकारत आहेत, असा स्पष्ट आरोप करत उमर यांनी महबूबांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.


उमर अब्दुल्ला यांनी सिंधु जल कराराला "जम्मू-कश्मीरच्या जनतेच्या हिताविरुद्ध झालेला ऐतिहासिक विश्वासघात" ठरवत, "या कराराच्या मी कायमच विरोधात होतो आणि राहीन," असा स्पष्ट पवित्रा घेतला. "आम्ही युद्ध भडकवत नाही, पण आमचं पाणी, आमच्या गरजांसाठी वापरण्याचा हक्क मागतो आहोत," असेही ते म्हणाले.





यावर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती यांनी थेट उमर अब्दुल्ला यांच्या पुर्वजांवर निशाणा साधला. "तुमचे आजोबा शेख अब्दुल्ला यांनी सत्तेपासून हकालपटी झाल्यानंतर पाकिस्तानशी सलगीसाठी दोन दशके प्रयत्न केले. पण पुन्हा मुख्यमंत्री होताच त्यांचा सूर अचानक बदलला!" असा घणाघात करत, पीडीपीने मात्र "नेहमीच आपली बांधिलकी जपली" असा दावा केला.


उमर यांनी त्यावर "मी मेहबूबा जींसारखा खालच्या पातळीवर नाही जाणार. मी अजूनही जम्मू-कश्मीरच्या हितासाठीच बोलतोय," असा पलटवार करत, "माझं काम करत राहीन, तुम्ही पोस्ट करत रहा," असं म्हणत मेहबूबा मुफ्ती यांना फटकारले.

Comments
Add Comment