
मुंबई : मुंबई पोलिसांनी दिल्लीत राहणाऱ्या ३४ वर्षांच्या लक्ष्मी सोलंकीला अटक केली आहे. लक्ष्मीकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंबईत बोरिवली स्थानकात प्रचंड गर्दी असते. बोरिवलीतून लोकल तसेच अनेक लांबच्या गाड्या सुटतात. ही सर्व माहिती घेतल्यानंतर दिल्लीच्या मलकागंज परिसरात राहणारी लक्ष्मी मुंबईत आली होती. ती एका हॉटेलमध्ये उतरली होती. या हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मी बोरिवली स्थानकावर गेली होती. बोरिवली स्थानकावर असलेल्या प्रचंड गर्दीत हातचलाखी करुन लक्ष्मी चोरी करत होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी लक्ष्मीने गर्दीत हातचलाखी केली आणि ममता नावाच्या महिलेच्या पर्समधील लाखो रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी ममताच्या पतीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तक्रारदार पती आणि त्याची पत्नी यांनी दिलेली माहिती याआधारे तपास करुन लक्ष्मीला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर लक्ष्मीने गुन्हाची कबुली दिली आणि चोरलेला माल पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी चोरलेला ऐवज जप्त केला.
ममता एका समारंभासाठी जात होती. तिच्या पर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने होते. हेच दागिने लक्ष्मीने चोरले होते. पण पोलिसांनी लक्ष्मीला पकडले आणि सगळा प्रकार उघड झाला. लक्ष्मी दिल्लीत वास्तव्यास होती. पण मुंबईची माहिती मिळाल्यानंतर ती चोऱ्या करुन झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने बोरिवलीत आली होती. याआधीही लक्ष्मी चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीला बडोद्यात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. तिथून सुटल्यानंतर लक्ष्मीने तिच्या कारवायांचे ठिकाण बदलले होते.