
भारताकडून नद्यांवरील प्रकल्पांच्या कामाला गती
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २७ हिंदू पर्यटकांचा नरसंहार केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी असलेला सिंधी पाणी करार रद्द केला. आता आणखी एक पाऊल टाकत भारताने सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सिंधू करार रद्द झाल्याने संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी १३ मे रोजी स्पष्ट केले होते की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत भारत सिंधू पाणी करार स्थगित ठेवला जाईल. यासोबतच भारताने आपल्या मुख्य प्रकल्पांपैकी एक म्हणजे चिनाब नदीवरील रणबीर धरणाची लांबी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. या नदीचे पाणी भारतातून पाकिस्तानातील पंजाबमधील शेती क्षेत्रात जाते.
जेव्हा भारत आपला प्रकल्प पूर्ण करेल, तेव्हा ते प्रति सेकंद १५० घनमीटर पाणी वळवू शकेल, सध्या फक्त 40 घनमीटर पाणी वळवण्याची क्षमता आहे. यासोबतच भारत रणबीर कालव्याच्या विस्ताराच्या योजनेसोबतच, अशा प्रकल्पांवरही विचार करतोय, ज्यामुळे पाकिस्तानला वाटप केलेल्या नद्यांमधून पाण्याचा प्रवाह कमी होईल. यामुळे पाकिस्तानला स्वतःसाठी वीज निर्मिती करण्यासाठी देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्याशिवाय भारताने जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केली आहे, ज्यामुळे वीज निर्मिती ३,३६० मेगावॅटवरून १२ हजार मेगावॅटपर्यंत वाढेल. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकणारे धरणे देखील समाविष्ट आहेत.