Friday, May 16, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'भारताच्या ब्राह्मोसपुढे झुकला पाकिस्तान'

'भारताच्या ब्राह्मोसपुढे झुकला पाकिस्तान'
भुज : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवार १८ मे रोजी भुज येथील हवाई तळाला भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या कारवाईत ब्राह्मोस क्रुझ क्षेपणास्त्राची महत्त्वाची भूमिका होती. या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्तान झुकला, असे संरक्षणमंत्री म्हणाले. भारतात तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस क्रुझ क्षेपणास्त्राने पाकिस्तानला रात्री दिवसा असतो तसा प्रकाश दिसू लागला; असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

भारताचे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष आहे. पाकिस्तानने दहतवाद्यांना मदत करणे थांबवले आणि दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई केली तर उत्तम. अन्यथा पाकिस्तानला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल. ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. योग्य वेळ येताच भारत पूर्ण चित्र जगाला दाखवेल; असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

माणसं नाश्ता करण्यासाठी जेवढा वेळ खर्ची घालतात तेवढ्या वेळात भारताच्या शूर सैन्याने दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला. भारताच्या शूर सैन्याने शत्रूच्या प्रदेशाला लक्ष्य करुन क्षेपणास्त्रे डागली. दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना समजेल अशा शब्दात उत्तर दिले. भारताच्या क्षेपणास्त्रांचा आवाज फक्त पाकिस्तानलाच नाही तर पूर्ण जगाला ऐकू गेला आहे. हा आवाज फक्त क्षेपणास्त्रांचा नव्हता तर भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचाही होता.

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट दिल्यानंतर आता संरक्षणमंत्र्यांनी भुजच्या हवाई तळाला भेट दिली आणि सैन्याचे कौतुक केले. सैनिकांनी भेटून त्यांचे अभिनंदन केले. जवानांना मिठाई भरवली. जवानांशी संवाद साधला. संरक्षणमंत्र्यांनी भूजमधील स्मृतीवन भूकंप स्मारक आणि संग्रहालयाला भेट दिली. तसेच २६ जानेवारी २००१ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment