
मुंबई : मुंबईत मेट्रो ३ अॅक्वा लाईनवर मोबाईलला सिग्नल मिळत नाही, नेटवर्क गायब आहे, इंटरनेट अभावी यूपीआयचा पर्याय वापरता येत नाही; अशा तक्रारी प्रवासी करू लागले आहेत. ही समस्या तीन - चार दिवसांपासून जाणवत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या सर्व प्रमुख सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहकांनी भूमिगत मेट्रो स्थानकावर आल्यापासून ते तिथून बाहेर पडून रस्त्यावर येईपर्यंत समस्या जाणवत असल्याची तक्रार केली आहे.
मेट्रो ३ अॅक्वा लाईनचा विस्तार झाला आहे. आता आरे जेव्हीएलआर ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत ही मेट्रो सेवा उपलब्ध आहे. पण मार्गाचा विस्तार झाला आणि मोबाईल धारकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
समस्येवर उपाय शोधण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यात चर्चा सुरू आहे. पण अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे मेट्रो प्रवाशांचे हाल होत आहेत. तिकीट काढताना यूपीआयचा पर्याय वापरता येत नाही. मेट्रो प्रवासात मोबाईलद्वारे संवाद साधणे अशक्य होते. भूमिगत मेट्रोच्या स्थानकात अथवा भूमिगत मेट्रोत असताना प्रवासी संपर्क क्षेत्राबाहेर जातात. या समस्येवर तातडीने उपाय करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.