
दहावी-बारावीचे निकाल लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा सावित्रीच्या लेकीच हुशार ठरल्याने मुलांहून त्यांचा टक्केवारीचा आकडा अधिक ठरला आहे. गेल्या काही वर्षांत पिछाडीवर पडलेल्या लातूर पॅटर्नने पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणात हापूस आंबा सोडला, तर परशूरामाच्या कोकण भूमीची फारशी दखल घेतली जात नसली तरी गुणवत्तेच्या व बुद्धीमत्तेच्या बाबतीत गेली १५ वर्षे महाराष्ट्रामध्ये कोकण मंडळाने दहावीच्या निकालामध्ये आपला प्रथम क्रमांक सोडलेला नाही, ही कोकणवासीयांसाठी नक्कीच अभिमानाची, भूषणावह बाब आहे. महाराष्ट्रातल्या अन्य भागातल्या मुलांपेक्षा कोकणची मुले खरोखरीच हुशार असतात, हे त्यांनी दहावीच्या निकालामध्ये एक-दोन नव्हे, तर सलग चौदा-पंधरा वर्षे दाखवून दिले आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर संबोधले जाते. मुंबई शहर, उपनगरात अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतानाही कोकणची मुले सातत्याने दहावीच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक पटकावत आहेत. राज्यात नऊ विभाग असताना पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या आठ विभागांना गेल्या १४-१५ वर्षांत एकदाही प्रथम क्रमांक मिळवून दिलेला नाही, याबाबत कोकण मंडळातील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे खरोखरीच अभिनंदन केले पाहिजे. या वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे, तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे. या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुले नेत्रदीपक यश एकीकडे मिळवत असताना तब्बल ४९ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे, याकडेही कानाडोळा करून चालणार नाही. या ४९ शाळांमध्ये नाशिकच्या ४, पुण्यातील ७, नागपूरच्या ८, संभाजीनगरच्या ९, मुंबईच्या ५, अमरावती ४, लातूरच्या १०, कोकण व कोल्हापूरच्या एका शाळेचा समावेश आहे. याशिवाय, २८५ विद्यार्थ्यांना केवळ ३५ टक्के गुण मिळाले, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही वर्षांपूर्वी गुणवत्ता यादी प्रकाशित व्हायची, ही गुणवत्ता यादी त्या-त्या विभागनिहाय प्रसिद्ध होत असे. तथापि बोर्ड परीक्षेत आलेल्या अपयशामुळे तसेच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या स्पर्धात्मक भीतीमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढू लागले. त्यानंतर गुणवत्ता यादी लावण्याचा प्रकारच बंद करण्यात आला. या वर्षी परीक्षेमध्ये कॉपी प्रकार होऊ नये यासाठी सरकार, मंडळ व पोलीस विभागांकडून जोरदार प्रयत्न झाले. काटेकोर उपाययोजना करूनही काही ठिकाणी कॉपी करण्याच्या घटना घडल्याच, त्या परीक्षा केंद्रांवर बोर्डाकडून कारवाईची प्रक्रिया सुरूच आहे. वाढत्या निकालामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी या यशामागे एक चितेंची झालरही दडलेली आहे. मुलांनी यशाची शिखरे दहावीच्या निकालामध्ये पादाक्रांत केली असली तरी पुढे मुलांच्या अॅडमिशनचे काय? या चिंतेचे सावट विद्यार्थ्यांसह पालकवर्गाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटू लागले आहे.
पूर्वीच्या तुलनेत निकालाचा आलेख अलीकडच्या काळात उंचावत चालला आहे. पूर्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविताना फारशा अडचणी येत नसायच्या. बदलत्या काळात अॅडमिशनचे चित्र बदलत चालले आहे. काही काळापूर्वी निकाल लागल्यावर महाविद्यालयाच्या प्रांगणात अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागायच्या. अॅडमिशनसाठी मुले किमान तीन ते चार कॉलेजचे अॅडमिशन अर्ज भरून ठेवायचे, जिथे प्रवेश मिळेल, तिथे आवडीनुसार प्रवेश घेऊन मोकळे व्हायचे. कॉलेजची संख्या वाढत असली तरी तुलनेने विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत चालली आहे. उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही वाढत चालले, केवळ उत्तीर्णच नाही तर मिळालेली टक्केवारीदेखील किमान ७०, ७५, ८०, ८५च नाही तर ९० टक्क्यांच्याही पुढे जाऊ लागली आहे. पूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांना ६० टक्के मिळाले तरी फर्स्ट क्लासने मुलगा-मुलगी पास झाली, असे पालकांकडून अभिमानाने सांगितले जात असे. विद्यार्थ्यांने ७५ टक्क्यांच्यापुढे अधिक गुण मिळविले, तर मुलाला-मुलीला डिस्टीक्शन मिळाले, सांगताना पालकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असायचा. पण आताच्या काळात सरसकटपणे अधिकाधिक मुलांना जवळपास ८० टक्क्यांच्या पुढेच गुण मिळू लागल्याने फर्स्ट क्लास, डिस्टिक्शन हे शब्दच कालबाह्य ठरू लागले आहे. ८५, ९०, ९५ टक्के पडले, असेच आता कानावर पडत आहे. विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळत असल्याने व पूर्वीच्या तुलनेत विद्यार्थी संख्याही वाढल्याने आता प्रवेशासाठी सातवी-आठवी यादी प्रकाशित होऊ लागली आहे. आता अॅडमिशनसाठी अर्ज भरा, हव्या असलेल्या महाविद्यालये, विद्यालयांची दहा-पंधरा नावे टाका, मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्या असा प्रकार सुरू झाला आहे. ९० टक्केच्या पुढे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना रुपारेल, रुईया, झेविअर्स, झुणझुणवाला, सौमय्या आदी महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असतो. वाणिज्य शाखेत जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश हवा असतो. अभियांत्रिकीमध्ये करिअर करू पाहणाऱ्यांना व्हीजेटीआयमध्ये प्रवेश हवा असतो. इच्छा काही असली तरी गुणवत्तेची टक्केवारी सागरांच्या लाटांप्रमाणे उसळी घेऊ लागल्याने प्रवेशासाठीची चौथी-पाचवी यादीदेखील आता ७५ टक्केच्या आसपास येऊ लागली आहे. ६० ते ६५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आठव्या प्रवेशयादीची वाट पाहण्याची वेळ आली आहे. शहरी भागातील मुलांचा सायन्स, काॅमर्स व अभियांत्रिकीकडे अधिक कल असतो. ग्रामीण भागातील मुलांचे अर्थकारण आजही जुजबी असल्याने आयटीआयचा कोर्स करून पुणे, नाशिकसारख्या भागात विस्तारू पाहणाऱ्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून घरांचा आर्थिक भार उचलण्याकडे भर असतो. अॅडमिशनची प्रक्रिया आता वाढत्या गुणवत्तेमुळे त्रासदायक व तापदायक ठरू लागली आहे. कल्याण-डोंबिवली, बदलापूर अगदी पनवेलच्या मुलांचाही ८५ ते ९० टक्के गुणांच्या आधारावर मुंबईतील कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा भर असतो. यामुळे सुरुवातीची दीड महिने अपेक्षित कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी धावाधाव केल्यावर पदरी यश मिळत नसल्यावर यादीमध्ये जे कॉलेज येईल. तिथे प्रवेश विद्यार्थी घेत असतात. यशाची वाढती टक्केवारी हव्या असलेल्या कॉलेजच्या अॅडमिशनसाठी माफक नसल्याने इतक्या गुणांचा काय फायदा असे नैराश्येने बोलण्याची वेळ पालकांवर व विद्यार्थ्यांवर येत असते.