
रत्नागिरी : देशात २०३५नंतर वयस्क व्यक्तींची संख्या वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या आणि उपायांबाबत आतापासूनच विचार करायला हवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
टाकेडे (ता. मंडणगड) गावात 'हॅबिटॅट फॉर ह्युमन फाउंडेशन'तर्फे उभारण्यात आलेल्या मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन आज (१५ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री आशीष शेलार, प्रसाद लाड, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, पद्मश्री दादा इदाते, डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, वृद्धाश्रम उभारणारे डॉ. जलील परकार आणि शगुफ्ता परकार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भारत हा आज युवा देश म्हणून ओळखला जातो. सरासरी आयुर्मान ५० वर्षांवरून ७२ वर्षांवर आले असून ते ८५ वर्षांवर जाणार आहे. आज देशाचे ६० टक्के नागरिक २७ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मात्र, लोकसंख्येची ही रचना दर वर्षी बदलत जाणार असून, २०३५नंतर आपल्या देशात वयस्क व्यक्तींची संख्या दर वर्षी वाढत जाईल. म्हणून त्यांच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना यांचा आपल्याला आताच विचार करावा लागेल. या पार्श्वभूमीवर डॉ. जलील परकार यांच्यासारखे निष्णात डॉक्टर पुढे येऊन अशा सुंदर वृद्धाश्रमाची व्यवस्था उभी करतात, ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. समाजात असे काम करणारी मंडळी आहेत, म्हणूनच आपला समाज योग्य प्रकारे चालतो.
पूर्वी कुटुंबव्यवस्था शक्तिशाली असल्याने भारतात वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती. मात्र, आता कुटुंबे लहान झाली, ओलावाही कमी झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृद्धाश्रमांची गरज भासू लागली. परंतु, समाजच एखादे आव्हान उभे करतो, तेव्हा समाजातीलच कोणी तरी पुढे येऊन त्या आव्हानाशी सामना करतो. डॉ. जलील परकार यांनीही आपल्या कार्यातून ते केले आहे. डॉक्टर कसा असावा, हे त्यांनी कायमच आणि कोविड काळात स्वतः गंभीर आजारी असतानाही दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या वृद्धाश्रमाची गणना महाराष्ट्रातील पहिल्या चार-पाच वृद्धाश्रमांत करू शकतो. इथला परिसर सुंदर आहे. इथे येणाऱ्या वृद्धांसोबत कुटुंब नसले, तरी इथे निसर्गसौंदर्य आहे. शांतता आहे; पण एकटेपणा नाही. हा वृद्धाश्रम आहे; पण निराशा नाही. इथे आशेचे वातावरण आहे. इथे फळबागा, फुलझाडे वाढवण्यात आली आहेत. नदी आहे. वृद्धांना येथे मानसिक शांती मिळेल. तसेच या निसर्गामुळे येथील वृद्धांचे आयुष्य पाच-दहा वर्षांनी वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकारकडून कोणतीही मदत न मागता तुम्ही हे सारे उभे केले; पण भविष्यात कधी मदत लागली, तर हक्काने सांगावे. आम्हीही या चांगल्या कामासाठी फूल ना फुलाची पाकळी नक्कीच मदत करू, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
डॉ. जलील परकार म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर कोविड काळ आला. कोविडमध्ये त्यांनी पुष्कळ मदत केली. त्यानंतर जागा घेऊन हा वृद्धाश्रम उभा करायला मला तीन वर्षे लागली. या कामासाठी मदत केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे.