Friday, May 16, 2025

महाराष्ट्र

अकोले तालुक्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अकोले तालुक्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अकोले : अकोले तालुक्यातील बहुतांश भागात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साठले होते.अकोले शहर व परिसरात दुपारच्या वेळी एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला.आढळा व प्रवरा विभागात सर्वदूर धुव्वाधार पाउस कोसळला.


आढळा विभागातील समशेरपुर ,टाहाकारी, सावरगाव पाट,देवठाण, तांभोळ,विरगाव, पिंपळगाव निपाणी,हिवरगाव ,डोंगरगाव ,गणोरे, या गावासह प्रवरा पट्ट्यातील विठे ते कळस पट्ट्यातील सर्व गावांतही दुपारी धो- धो पाऊस कोसळला. सुमारे तास- दिड तास पाउस सूरू असल्याने रस्त्यावर व शेतांमध्ये पाणीच पाणी साठले होते. ओढे नाले यांचे पाणी नदीला मिळत आहे.त्यामुळं प्रवरा नदी पात्र वाहते झाले आहे.मुळा विभागातील काही गावांत अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.तर आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह,शाळा खोल्या, ग्रामपंचायत इमारत,घरे, जनावरांचे गोठे,रस्त्यांचे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे आदिवासी विभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या परीसरात गारठा निर्माण झाला आहे.जोरदार पावसामुळे खराब झालेले शिरपुंजे ग्रामपंचायतचे पत्रे यापूर्वी दोन वेळेस दुरुस्त करण्यात आले होते. त्यांनतरही दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पत्रे वाकले आहेत. लोखंडी पोलही वाकले आहेत.असे येथील सामजिक कार्यकर्त्यांनी कळविले आहे.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत च्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.चार पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे या परिसरातील अनेक घरे, जनावरांचे गोठे , रस्त्यांचे नुकसान झाले आहे.अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये विशेषत्वाने पश्चिम विभागामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.



यासंबंधी शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले यांनी केली आहे.दरम्यान शिर्डी लोकसभेचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पत्र व्यवहार करून व दूरध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई संदर्भात माहिती दिली असून अकोले तालुक्यात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव यांनी दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पंचनामे करण्यासंदर्भात अवकाळी संदर्भात माहिती दिली असल्याचे एकनाथ यादव यांनी सांगितले.

Comments
Add Comment