
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन; नोंदणी १९ मेपासून
मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, १९ ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर केंद्रीकृत प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
विद्यार्थ्यांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. यापूर्वी ऑफलाइन अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी अर्ज, दस्तऐवज अपलोड, गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी, आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत असून कोणताही गैरव्यवहार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय कक्ष व हेल्पलाइन (८५३०९५५५६४) आणि [email protected] या ईमेलवर मार्गदर्शन उपलब्ध आहे.
प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी किमान १ आणि जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रम भरावे लागतील. जर पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात गुणांनुसार जागा मिळाली, तर तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना फक्त 'सर्वांसाठी खुली फेरी' या शेवटच्या फेरीतच संधी मिळेल.