
ठाणे: मुंबई आणि नवीन मुंबई पाठोपाठ ठाणे शहरात देखील ड्रोन उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाणे शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होवू नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई आणि नवी मुंबईत देखील याप्रकारे बंदी घालण्यात आली आहे.
ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणे उडविण्यास मनाई असेल. हा आदेश दि.14 मे 2025 पासून लागू झाला असून दि.3 जून 2025 पर्यंत तो अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि तातडी लक्षात घेवून हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. उपायुक्त (मुख्यालय-1), विशेष शाखा, ठाणे शहर, डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
प्री वेडिंग आणि लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंगदेखील बंद
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ड्रोनची दहशत सर्वांच्या मनात आहे. ठाणे आणि मुंबईत मोठमोठ्या इमारती असल्याने या शहरांत ड्रोन हल्ल्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे पोलिसांकडून ड्रोन, पॅराशूट, पॅराग्लायडिंग या सर्वावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी काही लोकांकडून विनापरवानगी ड्रोन उडविले जात आहेत. मुंबईत आठवड्याभरात पोलिसांनी ड्रोन उडविणाऱ्यांवर आठ ते दहा गुन्हें दाखल केले आहेत. या बंदीमुळे प्री वेडिंग तसेच, लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंग अडचणीत आले आहे. पोलिसांची बंदी घुडकावून असे चित्रिकरण करणाऱ्या ड्रोन ऑपरेटरवरही गुन्हे दाखल केले जात आहेत.