
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ या चक्रीवादळाच्या निर्माणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १६ ते १८ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. हे वादळ २३ ते २८ मेच्या दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल व बांगलादेशाच्या किनारपट्टी भागांना धडकू शकते.
हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण पूर्व किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संभाव्य वादळामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रात उंच लाटा उठण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत माहितीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.