Friday, May 16, 2025

ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

१५८ कोटी निधीचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच; मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे गौरवोद्गार

१५८ कोटी निधीचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच; मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे गौरवोद्गार

मालवण : देवबाग गावावर राणे साहेबांचे विशेष प्रेम नेहमीच दिसून आले. १९९० साली किनारपट्टीवर बंधारा उभारून राणे साहेबांनी गाव सुरक्षित केला. रस्ते केले, सुविधा दिल्या. गावाने पर्यटनातून क्रांती केली. जगाच्या नकाशावर आलेला देवबाग गाव समुद्र आणि खाडी या दोन्ही बाजूने अधिक संरक्षित करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी अग्रक्रम दिला. विधिमंडळातील पहिल्याच भाषणात किनारपट्टी संरक्षण हा मुद्दा अभ्यासपूर्ण मांडणाऱ्या आमदार निलेश राणे यांची मागणी महायुती सरकारने त्वरित पूर्ण करताना १५८ कोटी निधी मंजूर केला. मागील आमदार आठ वर्षे सत्तेत राहून जे करू शकला नाही ते आमदार निलेश राणे यांनी चार महिन्यात करून दाखवले. येथील बंधारा उभारणीसाठी रेकॉर्डब्रेक स्वरूपात निधी मंजूर झाला. आमदार कसा असावा हे निलेश राणे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले. पुढील साडेचारच नव्हे तर अनेक वर्ष गतिमान विकासाचे हे पर्व असेच सुरु राहील. आमची बांधिलकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी असून जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करत राहणार. असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी देवबाग येथे बोलताना व्यक्त केले.


दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार गतिमानपणे कार्यरत आहे. हे जनतेचे सरकार असून महायुतीचा अभेद्य असा बंधारा जनसेवेसाठी भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे विरोधक भुईसपाट झाले आहेत. असेही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी १५८ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवबाग विठ्ठल मंदिर येथे खाडी किनारी संपन्न झाला. मोठ्या प्रमाणात विकासनिधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने महायुती सरकार तसेच खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच ग्रामस्थ व रापण संघ सदस्य यांच्या वतीने मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, जिल्ह्यात मोठया प्रमाणात विकासकामे होत असताना दर्जेदार कामांना महत्व दिले जात आहे. प्रत्येक विकास प्रकल्पावर प्रशासन अधिक लक्ष देत असून प्रत्यक्ष पाहाणी करून वस्तुस्थितीचा आढावा स्वतः घेतला जात असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तसेच मत्स्य व बंदरे खात्याच्या माध्यमातून अधिकाधिक निधी जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.



देवबाग किनारी संरक्षक बंधारा उभारणीसाठी १५८ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल महायुती सरकार, अर्थमंत्री अजित पवार, बंदर मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. असे सांगून आमदार निलेश राणे म्हणाले, मालवण कुडाळ मतदारसंघात मागील दहा वर्षात काहीच आले नाही. बॅकलॉग खूप मोठा आहे. तो भरून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता आपल्या महायुती सरकार माध्यमातून मोठा निधी येत आहे. एका देवबाग गावासाठी एकाचवेळी १५८ कोटी मंजूर झाले ही खूप समाधानाची बाब आहे. मात्र अनेक कामे करायची आहेत. ही सुरवात आहे. देवबाग गावातच बंधारासाठी अजून २५ कोटी मंजूर झाले आहेत. रस्ते, वीज, पाणी यासाठीही निधी आणला जात आहे. माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेतच. महायुती सरकार, खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे यांची साथ मिळतं आहे. मतदारसंघातील जनतेसाठी खूप काही करायचे आहे. असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment