Sunday, October 26, 2025
Happy Diwali

हाँगकाँग - सिंगापूर मध्ये कोरोना परतला!

हाँगकाँग - सिंगापूर मध्ये कोरोना परतला!

व्हिक्टोरिया सिटी : जगभरात थैमान घातल्यानंतर आणि काही काळानंतर स्थिर झालेला कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा आशियात परतला आहे. हाँगकाँग आणि सिंगापूर मध्ये कोविड-१९ रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचा इशारा दिला आहे.

हाँगकाँगच्या आरोग्य संरक्षण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३ मेच्या आठवड्यात ३१ गंभीर प्रकरणे समोर आली आहेत, ही संख्या गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहे. संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलं की, पॉझिटिव्ह प्रकरणांची टक्केवारीही आता उच्च पातळीवर पोहोचली आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. तरीही, या नव्या लाटेमुळे शहरातील रुग्णालयांवर ताण वाढत असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ३ मेच्या आठवड्यात रुग्णसंख्या अंदाजे १४,२०० इतकी झाली असून, ही संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८ % अधिक आहे. ही वाढ लक्षात घेता सिंगापूरनेही हाय अलर्ट जाहीर केला आहे.सिंगापूर आरोग्य मंत्रालयाच्या मते कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ ही लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्यामुळे होऊ शकते. मात्र, सध्याचे प्रकार साथीच्या काळात दिसलेल्या प्रकारांपेक्षा जास्त गंभीर किंवा पसरणारे असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दोन्ही शहरांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, तसेच लोकांना विशेषतः जास्त धोका असलेल्यांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment