
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वानखेडेवरून घोषणा
मुंबई : मुंबई येथील वानखेडे मैदानावर शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने मुंबईचा राजा आणि भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा, ज्येष्ठ नेते शरद पवार, दिवंगत माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर आणि एमसीएचे माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या स्टॅंडचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास एक लाख प्रेक्षक बसू शकतील एवढ्या क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडीयम उभारू, अशी घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांचे क्रिकेटमधील योगदान नेहमीच लक्षात राहील असे शरद पवार तसेच आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करणारे रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. शरद पवार यांच्याबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही की भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणि क्रिकेटचे जे प्रशिक्षक असतील त्यांच्यात शरद पवार यांचे नाव नेहमीच आदरणीय राहील. बीसीसीआय असेल किंवा आयसीसी असेल यात शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने शरद पवार यांच्या नावाचे स्टँड उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे याचे मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेड स्टेडियमवर जोरदार बॅटींग करत शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली.

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वानखडे स्टेडियमवर आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचे स्टॅंड दिसणार आहे. या भव्य सोहळ्यात वानखेडे स्टेडियममध्ये रोहित ...
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझे मित्र अमोल काळे यांनी एमसीएमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. अमोल काळे यांना अचानक ईश्वर आज्ञा झाली, पण त्यांनी पाहिलेले स्वप्न मुंबई क्रिकेट असोसिएशन नक्कीच पूर्ण करेल. एमसीए लॉंजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच रोहित शर्मा म्हणजे जे मैदानात आल्यावर मैदान दणाणून सोडतात. त्यांनी अशा दोन स्पर्धा जिंकवून दिल्या आहेत, ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण करून दाखवल्या. त्यांचे मैदानात मोकळेपणाने वागणे ही त्यांची ओळख आहे. कर्णधार म्हणून त्यांची कामगिरी सगळ्या फॉरमॅटमध्ये अतिशय सुंदर आहे. आम्ही आता वाट पाहत आहोत की त्यांचा एक शॉट कधी रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो याची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगले आणि अधिक काळ खेळतील.
वानखेडे क्रिकेटची खरी पंढरी
खरे तर लोक पूर्वी असे म्हणायचे की, लॉर्ड ही क्रिकेटची पंढरी आहे. परंतु खरी पंढरी ही वानखेडे आहे. पंढरी तिथे देव त्या अर्थाने वानखेडे येथे सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आहे. वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पुढील ५० वर्ष वानखेडे हे आयकॉनिक स्टेडीयम म्हणून ओळखले जाईल. मागच्या काळात अमोल काळे आणि अजिंक्य नाईक यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील असे स्टेडीयम उभारण्याबाबत माझ्याशी चर्चा केली होती. मी आजच या ठिकाणी सांगतो की, मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा तुम्हाला दिली जाईल. किमान एक लाख प्रेक्षक बसू शकतील असे स्टेडीयम उभारू, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना दिला. तसेच या अतिशय सुंदर कार्यक्रमात तुम्ही मला बोलावले हा मी माझा सन्मान समजतो, असेही ते म्हणाले.
वानखेडेचा वारसा
वानखेडे स्टेडियम हे मुंबई क्रिकेटचे हृदय आहे. या स्टँड्सच्या उद्घाटनामुळे स्टेडियमचा वारसा आणखी समृद्ध होणार आहे. उद्घाटनानंतर रोहित शर्मा २१ मे २०२५ रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्ससाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे, जिथे चाहते रोहितच्या नावाचा जयघोष करत स्टँडच्या सन्मानाचा आनंद घेतील.