
ऋतुराज : ऋतुजा केळकर
‘आकाशाचा शोध घेत...
मातीचे हात थांबले...
वाऱ्याच्या पंखावर उसासे जडलेले...
संवेदनेच्या तळाशी...
आवाज अस्तित्वहीन निःशब्द...
तरीही उंच भरारी...
माझ्या अस्तित्वाची...’
आत्मा म्हणजे नक्की काय?” याच विचारांत अडकलेल्या माझ्या लेखणीतून हे काव्य उतरले. पण खरच कुणाला हा प्रश्न पडतो का? मला उमगलेला ‘आत्मा’ म्हणजे वाऱ्यावर उमटणारा निःशब्द शब्द, संवेदनांच्या सावलीत हरवलेली एक ओळख. अस्तित्वाच्या काठावर उभे असलेला एक अनाकलनीय शब्द...म्हणजे आत्मा! मातीच्या कुशीत रुजून आकाशाच्या अथांगतेचा शोध घेणारा एक श्वासांचा प्रवाह. एक संवेदना जणू, एक निःशब्द स्पंदन, कुठेतरी दूर जाणाऱ्या पावलांचा भास. ते स्पर्शाच्या आठवणीतील थरथरणे तरीही आकाशाच्या अंतराळात हरवलेले एक मौन. संवेदना म्हणजे वाऱ्याच्या लयीत विसरलेली ओळख. जेव्हा देह आणि मन एकमेकांत विरघळतात ना तेव्हा त्या तुटलेल्या शब्दांची सावली म्हणजेच जेव्हा भावना केवळ अस्तित्वाचा गूढ ध्वनी होतो, संवेदनांच्या स्पंदनात हरवलेले, वाऱ्याच्या लयीत हलणारे एक मौनाचे संगीत. जन्माच्या तळाशी लपलेली ओळख, तर मृत्यूच्या सावलीत मिटणारी एक गूढ कथा म्हणजे ‘आत्मा’.
नितळ जगण्याच्या भावनाची मोरपंखी पैठणी म्हणजेच परशुरामी तत्त्वांना भिडताना, देहाच्या कणाकणातून उमटते ती खोलवर अज्ञात हाक, त्या हाकेतच सामावलेले चिरंतन अस्तित्वाचे गूढ. आत्म्याचा हा प्रवास म्हणजेच अवकाशातील एक गूढ प्रवाह, अनामिक स्पंदनात हरवलेली ओळख. ते अर्धवट शब्दांचा अंधार, श्वासांच्या सावलीत लपलेले अस्तित्व. जीवन जगण्याच्या या भावना म्हणजे वाऱ्याच्या लयीत विरघळलेला स्पर्श, एक शांत, तरीही धगधगता असा आक्रोश म्हणजेच मृत्यूपलीकडचा आवाज, एका अश्रूंमध्ये उमटणारा अज्ञात अर्थ.
कस सांगू तुम्हाला नक्की आत्म्याचा प्रवास तरी कसा असतो ते? अंधाराच्या कुशीत जन्मलेला एक निर्विकार असा प्रवास की, जो श्वासाच्या लयीत थरथरणारे एक अस्पष्ट स्पंदन. अनेकानेक इच्छांची पूर्तता करण्याकरिता आत्म्याने घेतलेला एक आधार की एक धूसर भास. तो मातीला स्पर्श करण्याकरिता होणारी त्याची तडफड आणि देहोत्सवाचे चोचले पुरवता पुरवता घेतलेली झेप आकाशाकडे, आकाशाचा शोध घेण्याकरिता, आत्म्याचा प्रवास सुरू होतो तो मृतीकेतून आणि बनतो आकाशाच्या कुशीत विरघळणारा एक विसरलेला ध्वनी. विसरलेला अश्यासाठी की तो असतो, चिरंतनतेच्या वाऱ्यावर हळुवार उडणारा एक अदृश्य भास, मृत्यूपलीकडेही जगणारा एक मौनाचा श्वास. अस्तित्व आत्म्याचे काय वर्णू मी? तसं बघायला गेलं तर क्षणात मिटणारे, पण तरी देखील काळाच्या तळाशी खोल ठसलेले. आत्म्याचे अस्तित्व श्वासांच्या लयी पेक्षाही हलके तरीही अनंततेच्या स्पंदनात सजीव असलेले , मातीच्या कुशीत रुजून आकाशाच्या शांततेत हरवलेले. ते आहे ही नाही ही. स्पर्शाच्या पलीकडचा एक अज्ञात ध्वनी. संवेदनांच्या थरथरणाऱ्या धारात वाहत जाणारा, अंधाराच्या कुशीत विसावणारा एक निःशब्द प्रकाश. तो शब्दांत नाही, पण अनुभवाच्या प्रत्येक छटेत झळकणारा. तो मृत्यूपलीकडेही श्वास घेत राहणारा एक मौनाचा प्रवाह.
आत्म्याची ओळख तत्त्वांच्या स्पर्शात विरघळते, त्याच्या अस्तित्वाचा शोध भावनांच्या सीमांपलीकडे भरकटतो. आत्म्याच्या प्रवासाकरिता त्याला आधार घ्यावा लागतो तो शरीराचा. हे शरीर हे अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पंचतत्त्वांपासून बनलेले आहे. ती म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. ही तत्त्वे केवळ शरीराच्या रचनेतच नाहीत, तर आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक प्रवासातही महत्त्वाची भूमिका बजावतात. पृथ्वी हे मृत्तिका तत्त्व आहे की जे शरीरातील घन पदार्थ, हाडे, स्नायू आणि त्वचा यांचे प्रतिनिधित्व करते. शरीराला पर्यायाने आत्म्याला स्थिरता आणि सहनशक्ती प्रदान करते. आत्मा आणि पृथ्वी हा एक अदृश्य प्रवास आहे. मातीच्या कुशीत मिटणारा आणि अनंताच्या मिठीत झुलणारा. तो धुळीत रुजतो, पण वाऱ्यावर झुलतो, त्याचा स्पर्श शेवटी मातीच्या ओलसर श्वासात विसावतो. आत्म्याला पृथ्वी आकार देते, पण मर्यादेत नाही बंधू शकत. ती त्याचा देह, आणि त्याची ओळख असले तरीदेखील तो मुक्त, अस्पष्ट, गूढ आणि अचल आहे की जो संवेदनांच्या जडत्वात शरीराच्या माध्यमातून पृथ्वीशी बांधलेला आहे. म्हणूनच तो मिटतो आणि उलगडतो, पृथ्वीच्या स्पर्शात हरवूनही आकाशाच्या प्रवाहात वाहणारा एक मौनाचा क्षण बनतो. जरी आत्मा हा पृथ्वी तत्वाने बनलेला असला तरी देखील तो एक काळाच्या सीमारेषांवर विरघळणारी हलकी सावलीआहे हे नक्की. आत्म्याशी निगडीत दुसरे तत्व आहे ते म्हणजे आप म्हणजेच जल तत्त्व.
हे तत्व रक्त, रस, आणि शरीरातील द्रव पदार्थ यांचे प्रतिनिधित्व करते कारण, त्यामुळेच भावनात्मक संतुलन आणि प्रवाहीपणा टिकून राहतो. आत्मा आणि आप तत्त्व हा एक ओलसर प्रवास आहे. भावना आणि स्मरणांच्या तलावात प्रतिबिंबित होणारा. पाण्याच्या लयीत तो हलतो, विरघळतो, कधी शांत तर कधी आक्रंदतो. आत्म्याचा स्पर्श थेंबांसारखा जरी क्षणभंगूर असला तरीही चिरंतन असतो कारण तो सरीत उतरतो आणि अखेरीस अनंताच्या ओढीत हरवतो. पाणी हा त्याचा वाहता आकार असला तरीही तो त्याच्याच निर्मितीची सावली बनून नदीतून प्रवाहित होऊन अखेरीस अनंताच्या ओढीत हरवतो. संवेदनांच्या ओलसर स्पंदनात आत्मा स्वतःचाच अर्थ शोधता शोधता, जलधारांमध्ये मुक्तीचा ध्वनी उमटवीत हरवून जातो. तिसरे तत्व अर्थातच अग्नी म्हणजेच तेज तत्त्व होय, यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहते. तसेच हे तत्व पचनशक्ती आणि ऊर्जा यांचे देखील प्रतिनिधित्व करते. अग्नी तत्व हे आत्मज्ञान आणि परिवर्तन याचे देखील प्रतीक आहे. आत्मा आणि अग्नी म्हणजे एक स्फुलिंगाचा स्पर्श, क्षणात झळकणारा आणि क्षणात चिरंतनतेत विलीन होणारा. अग्नी त्याचा प्रकट आक्रोश आहे आत्मा आहे त्याच्या शांत राखेत लपलेला एक मौन की तो जळतो, उजळतो, विलीन होतो आणि पुन्हा जन्म घेतो तो अंधाराच्या तळाशी साठलेली एक श्वासांची धगधग पुनपुन्हा प्रगत करण्या करिता. जरी आग त्याला मुक्त करत असली तरीही त्याच्या अस्तित्वाचे रंग ती उलगडते, पण त्या ज्वालांमध्ये स्पर्शही न होणारी एक निःशब्द हाक असते की ज्यात आत्मा त्या अग्नीच्या लहरींवर झुलतो, तरीही त्याच्या तापातून शांततेचा शोध घेऊन तो उजळतो आणि पुनर्निर्मित होतो तो एक विरघळलेला, विसरलेला ध्वनी, अस्थिर पण चिरंतन नाजूक अग्निशिखेसारखा. चौथे अर्थातच वायू तत्त्व, की जे श्वासोच्छ्वास, हालचाल आणि विचारशक्ती यांचे प्रतिनिधित्व करते. वायू तत्व जीवनशक्ती आणि चैतन्याचा स्रोत आहे . आत्मा आणि वायू याचा संबंध म्हणजे एक हलका श्वास, अस्तित्वाच्या सीमांना लंघणारा आणि चिरंतनतेच्या लयीत हरवणारा. तो अस्पर्श तरीही पण जाणिवेच्या कुंपणात आपल्या अस्तिवाचा खोल ठसा उमटवून ठेवणारा त्याचा स्पर्श वाऱ्याच्या झुळुकीत लपलेला असतो, तो विसरू म्हणता न विसरता येणारा, आठवण बनून स्वतःला हरवणारा पण तरीही ओळख ठेवणारा .कस आहे ना वायू आत्म्याला झुलवतो, हलवतो, पण धरून नाही ठेवू शकत. त्याच्या लहरींमध्ये आत्म्याचा मौन उमटते.

मुंबई: राज्यात सध्या रेशनकार्ड ई-केवायसी (Ration eKYC) मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे उत्पन्नाची खोटी माहिती देऊन सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला ...
आकाशाच्या कुशीत वाऱ्याच्या लयीत झुलणारा एक क्षण, ज्याचा अर्थ आत्म्याच्या प्रवासात खोलवर दडलेला आहे, म्हणूनच आत्मा वाऱ्यासारखा, अस्वस्थ, मुक्त, तरीही अढळ असून त्याच्या अस्तित्वाचा शोध शब्दांमध्ये नाही, तर अनुभूतीत आहे. सर्वात शेवटचे आणि पाचवे महत्वाचे तत्व म्हणजे ‘आकाश तत्त्व’, की जे शरीरातील रिक्त जागा, चेतना आणि आत्म्याशी जोडते. आकाश तत्व हे जीवनातील अंतर्मुखता आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे. आकाश त्याच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. त्याच्या अस्तित्वाची सावली आहे.म्हणूनच आत्मा आणि आकाश एकमेकात गुंफलेले असले तरीही निराळे आहेत.
अशा या आत्म्याचा अंत आहे का? हा प्रश्न अखेरीस मनाच्या पटलावर उमटतोच. बर तो एक प्रश्न की एक सावली? हा देखील एक प्रश्नच आहे. आत्मा हा वाऱ्याच्या ओढीत हरवलेला, तरीही अस्तित्वाच्या तळाशी खोल रुजलेला. तो मिटतो की विरघळतो? नष्ट होतो की मुक्त होतो? काहीच माहिती नाही त्याला मरण नाही हे मात्र नक्की. मृत्यूच्या कुशीत विसावतो तरीदेखील तो चिरंतनतेच्या ओलसर प्रकाशात झळकतो. म्हणूच आत्मा संवेदनांच्या धूसर सीमारेषांवर तरंगणारा एक प्रवाह आहे.
अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचं झाल तर,
‘आत्मा हा सुद्धा एक भन्नाट प्रवासी,...
कधी मातीचा, तर कधी आकाशाचा सोबती...
थोडा शहाणा, तर थोडा गोंधळलेला...
तरीही मृत्यूपलीकडेही...
चालत राहणारा एकांडा वाटसरू...