Thursday, October 30, 2025
Happy Diwali

ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार

ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार

मुंबई : शहरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. शहरातील विविध भागांत मेट्रोच्या कामांना जोर आला आहे. वडाळा ते अपोलो बंदर या भुयारी मेट्रो-११ साठी भूगर्भातील समुद्राचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. समुद्राचे पाणी नेमके किती खोलीवर आहे, हे तपासण्यासाठी जागोजागी ड्रीलिंगचे काम सुरू झाले आहे. या मेट्रोमुळे ठाणेकरांना थेट सीएसएमटीला पोहोचता येणार आहे.

वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो ११ ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो ४ अ आणि मेट्रो ४ ची विस्तारित मार्गिका आहे. ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशी (सीएसएमटी) जोडण्यासाठी या मार्गिकचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मार्गिका सीएसएमटीहून पुढे सर्कलखालून अपोलो बंदरपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने समुद्राच्या पाण्याचा अभ्यास केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते अपोलो बंदर या भागाचाच भू तंत्र तपासाच्याआधारे भूगर्भाचा अभ्यास केला जात आहे. या भागात जमिनीखाली समुद्राचे पाणी असण्याची शक्यता आहे, हे पाणी नेमक्या किती खोलीवर याचा अभ्यास होत आहे. त्यासाठी दर ५०० मीटर अंतरावर दीड ते तीन मीटर खोल खड्डे खणले जात आहेत.

Comments
Add Comment