Thursday, May 15, 2025

क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

रोहित-कोहलीऐवजी टीम इंडियाला मिळाले ‘नवे तगडे हिरो’

रोहित-कोहलीऐवजी टीम इंडियाला मिळाले ‘नवे तगडे हिरो’

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा धक्का बसला होता. या दोघांची जबाबदारी आता कोण पार पाडणार? ही बीसीसीआयची डोकेदुखी आता संपलीय, कारण त्यांच्या जागी दोन नवे दमदार खेळाडू उभे राहण्याची शक्यता आहे.



कसोटी संघात नव्या दमाचे चेहरे - ईश्वरन आणि सरफराज सज्ज!


२० जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणा-या (India vs Eng Test Series) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खान या दोन फलंदाजांचे नाव चर्चेत आहे. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रचंड सातत्याने चमकले आहेत.



अभिमन्यू ईश्वरन सलामीवीर म्हणून सिद्ध


बंगालकडून खेळणारा उजव्या हाताचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०१ सामने खेळत तब्बल ७६७४ धावा केल्या आहेत. २७ शतके, २९ अर्धशतके आणि ४८.८७ चा सरासरीचा आकडा ही त्याच्या स्थैर्याची साक्ष देते. बिहारविरुद्ध खेळलेली २३३ धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीतील खास कामगिरी ठरली होती.


रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सलामीच्या जागेसाठी ईश्वरन हा सर्वात प्रबळ पर्याय मानला जातो.



सरफराज खान मधल्या फळीतला नवा विश्वास


महाराष्ट्राचा सरफराज खान हा काहीसा उशिरा, पण लक्षणीय एन्ट्री घेणारा फलंदाज ठरला आहे. भारतासाठी आतापर्यंत ६ सामने, ११ डावांत ३७१ धावा, एक शतक, तीन अर्धशतके आणि ३७.१० चा सरासरीचा आकडा म्हणजे आश्वासक सुरुवात. त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे १५०.


विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर सरफराजला उतरवल्यास तो संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.



बीसीसीआयकडून लवकरच घोषणा शक्य!


भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार असून, ईश्वरन आणि सरफराजला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता निवड समिती काय निर्णय घेते आणि देशांतर्गत कामगिरीचा विचार करून हे दोघं नव्या युगाची सुरुवात करतील का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment