Thursday, May 15, 2025

श्रध्दा-संस्कृती

सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो


न निश्चय कधी ढळो कुजनविघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो
स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो


नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे
जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे
पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे


कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा


दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे
असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे


आई व तिचे मूल यांचे प्रेमसंबंध कोणत्या प्रकारचे असतात यावर प्रकाश टाकणारे केकावलीतले श्लोक, याच संदर्भात केकावलीच्या शेवटी ११८ व ११९ या केकांतून मोरोपंतानी परमेश्वराकडे केलेले अखेरचे मागणे मला पसायदानाइतके महत्त्वाचे वाटते. हे मागणे घरोघरी होणाऱ्या रोजच्या प्रार्थनेत जमा व्हावे अशा तोडीचे आहे. ‘सुसंगती सदा जडो, सुजन वाक्य कानीं पडो’ या चरणाने सुरू होणारी ११८वी केका व ‘न निश्चय कधी ढळो, कुजनविघ्नबाधा टळो’ या चरणाने सुरू होणारी ११९वी केका महाराष्ठ्रात अनेकांच्या तोंडी आहे.


जेव्हा मानवी जगण्यातला व त्याच्या प्रयोजनातला सुसंवाद तुटतो तेव्हा हे जगणे अर्थहीन होते. जगण्यासाठी संघर्ष अत्यावश्यक आहे. मात्र संघर्षातली मानवी मने जोडण्यासाठी सुसंवादही तितकाच गरजेचा आहे. मोरोपंत जो सुसंवाद आपल्या युक्तिवादातून परमेश्वराशी घडवून आणतात, तो मानवी मनाचे प्रयोजन दाखविणारे चित्र डोळ्यापुढे उभे करतो. आज आपला हा संवाद सतत तुटत चाललेला आहे. एकदा संवादाचे महत्त्व पटले की आपल्या जगण्याची शैली अचूक वळणाने जाते. मोरोपंतांनी ती आर्ततेने दाखवून दिली.


सुसंगती आणि सुजन वाक्य हे तर रोजच्या जगण्याचे प्रयोजन आहे. आम्हाला संगती आणि विसंगती यांचे अतूट नाते वेगळे करता येत नाही आणि यासाठी सुजन वाक्याची गरज आहे. वाक्य हे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांनी पूर्ण होते. यातले एकही पद कमी झाले तर वाक्याला अर्थ राहत नाही. पूर्ण वाक्य आपल्या पूर्ण जगण्याचे मर्म आहे. असे वाक्य दुर्जनही स्वीकारू शकतो मात्र त्याच्याजवळ सुसंगती नसते. सुसंगती आणि पूर्ण वाक्य यांची जोड हेच सज्जनाचे लक्षण आहे. आज आपण या वळणाला पारखे झाल्याने आपल्या जगण्यात संघर्ष येतो; सुसंवाद येत नाही. सुजन वाक्याच्या उच्चाराने जेव्हा आपले कान तृप्त होतात तेव्हा त्या वाक्याचा पूर्ण अर्थ आपल्या हृदयात स्थिर होतो. मग या उच्चाराला आचाराची जोड मिळते. जगण्याला दिशा सापडते. यंत्रवत जगण्याचा हेतू शून्य रटाळपणा अचूक मार्गदर्शनातून बाजूला काढता येतो. मोरोपंतांनी आपल्या पद्यातून हे मागणे परमेश्वराकडे केले. आपले प्रयोजन वेगळे असेल मात्र मार्ग एकच आहे. इथे तपशिल वदलला तरी तत्व तेच आहे.


मला सरळ मार्गाने जायचे आहे. वळणावर थांबून पुन्हा तोच सरळ मार्ग तोडायचा आहे. मी आखलेली सरळ रेषा इतरांनाही नागमोडी करता येणार नाही; कारण तिचा प्रारंभबिंदू सुजन वाक्यातून ठळक झालेला आहे. मोरोपंताची कविता आणि त्यातली आत्मपरता ही आजच्या आत्मपरतेपेक्षा वेगळ्या प्रकृतीची असली तरी ती आपल्या आजच्या जगण्याला सतत जाणवावी, असेच तिचे स्वरूप आहे. त्यातली मनाची आर्तता सतत प्रकट होते. आपल्या उतार वयात आणि उतरती कळा लागताना ही उपदेशप्रधान कवितासुता वयाने व गुणाने प्रौढ होऊन आपल्याला नवा आधार देते. हा उपदेश योग्यस्थळी पडणे व तेथेच स्थिर होणे तुमच्या कालोचित जगण्याशी निगडित आहे. इथे कवीची औचित्यपूर्ण प्रार्थना हीच तुमच्या रोजच्या जगण्याची अंतर्मुखता असते. मी जगण्याचा मार्ग शोधला आहे. त्यातली बाळबोध सरळ रेषा स्थिर आहे. त्यावरच माझे जाणे-येणे क्रमबद्ध झाले आहे. वाद, संवाद आणि सुसंवाद तसेच गती, विसंगती आणि सुसंगती या रेषेला छेद देणारी नसून आपल्या सुजन वाक्याची पूर्तता करणारी आहेत.

Comments
Add Comment