Thursday, May 15, 2025

विदेश

पाण्यासाठी पाकिस्तान रडकुंडीला

पाण्यासाठी पाकिस्तान रडकुंडीला

पाकच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताला पाठवले पत्र


नवी दिल्ली/ इस्लामाबाद : भारताच्या लष्करी कारवाईमुळे दबावाखाली आलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताकडे सिंधू पाणी वाटप करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला होता.


पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी भारताच्या जल शक्ती मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून, भारताने घेतलेला निर्णय पुनर्विचारात करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रात पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पाण्याविना पाकिस्तानातील शेती सुकण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच आता पाकिस्तान भारताकडे पाण्यासाठी गयावया करत आहे. दरम्यान, भारताने बगलिहार आणि सलाल धरणांतून पाणी रोखले आहे.


ऑपरेशन सिंदूर : भारताचा सर्जिकल प्रहार


७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर चार दिवस दोन्ही देशांमध्ये ड्रोन व लष्करी कारवाया झाल्या. त्यानंतर शस्त्रसंधी झाली असली तरी भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, सिंधू जलवाटप करार पुढील निर्णय होईपर्यंत स्थगितच राहील. पाण्यासाठी पाकिस्तानची अडवणूक झाली तरच दहशतवादावर तोडगा निघेल, असा सूर देशातील नागरिकांकडून आळविला जात आहे.


भारताचा निर्णायक निर्णय


२३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत भारत सरकारने सिंधू जलवाटप करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. १९६० साली स्वाक्षरी झालेल्या या संधीनुसार भारताला सुमारे ३० टक्के आणि पाकिस्तानला उर्वरित ७० टक्के जलप्रवाह वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला देण्यात येणारे पुराचे इशारे थांबवले आहेत.


परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण


भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी मंगळवारी सांगितले होते, ‘२३ एप्रिलच्या सीसीएस बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पाकिस्तान जेव्हा क्रॉस-बॉर्डर दहशतवादाला कायमस्वरूपी आणि विश्वासार्हपणे नकार देईल, तेव्हाच संधीबाबत पुढे विचार केला जाईल. शिवाय हवामान बदल, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानातील बदलांनी नव्या वास्तवांना जन्म दिला आहे’.

Comments
Add Comment