
रवींद्र मुळे : अहिल्या नगर
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या विनवण्या ऐकून ऑपरेशन सिंदूर भारताने स्थगित केले, अशा बातम्या पसरवत मोदी विरोधी गँगने एकदम उचल खाल्ली. सकाळ, दुपार, संध्याकाळ पाकिस्तानचे गुण गाणारे, मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानला आपल्याबरोबर घेऊ पाहणारे, शांतीची बोलणी झाली पाहिजे सांगणारे, अतिरेक्यांना हाफीज साब म्हणणारे आणि पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हिंदू संघटनांना गोवण्यात अग्रेसर असणारे सगळे मोदीजी यांचे कसे चुकले हे सांगू लागले. इंदिरा गांधींचे फोटो सोशल मीडियामध्ये झळकू लागले. तुलना सुरू झाली. मोदी यांच्या छातीची मापे घेण्याची स्पर्धा सुरू झाली. खरगे, राहुल बाबा यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचे डोहाळे लागले. पण हे काँग्रेसी, ही डावी इकोसिस्टीम आपल्या भूतकाळात झाकायला तयार नव्हती.
सन १९४८! देश स्वतंत्र झाला होता. फाळणीच्या जखमा अजून ओल्याच होत्या आणि इतक्यात पाकिस्तानी टोळधाड काश्मीरवर हल्ला करत आली. थेट श्रीनगरपर्यंत पोहेचत होती. भारतीय सेनेने अपुऱ्या युद्धसामग्री असताना त्यांना मागे रेटले. भारतीय सैन्य त्यांना काश्मीरमधून बाहेर काढण्यासाठी पराक्रमाची, शौर्याचे परिसीमा गाठत होता. आमचे शांतीदूत पंतप्रधान युनोमध्ये गेले. जैसे थे स्थितीचा आदेश निघाला. परिणाम म्हणजे आमच्या काश्मीरचा एक भाग POK झाला आणि LOC आमच्यावर लादली गेली.
सन १९६२ ! हिंदी-चिनी भाई-भाई नारे लगावणारे, कबूतर उडवणारे शांतीदूत! ना त्यांनी सैन्याला बळ दिले. ना शत्रूंना ते ओळखू शकले. परिणाम ६२ मधील युद्धात आमचे शूर सैनिक साधना अभावी मारले गेले. त्यांचे शौर्य अपुऱ्या साधनसामग्रीमुळे वाया गेले आणि आम्ही आमचे हजारो एकर क्षेत्र गमावून बसलो.
हे तेच शांतीदूत पंतप्रधान होते. ज्यांनी माय हार्ट गोस विथ आसामी असे म्हणून आसामी भारतीयांचे भवितव्य दैवावर सोडले होते. हे तेच शांतीदूत होते ज्यांनी गवताचे पाते ही उगवत नाही म्हणून चीनला जमीन बहाल केली होती. हे तेच शांतीदूत होते ज्यांनी कृष्ण मेननसारख्या चीन धार्जिणा माणसाला संरक्षण मंत्री करून चीनचे युद्ध ओढवून घेतले होते.
सन १९६५ : पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. भारतीय सेनेने पराकाष्ठा करत पाकिस्तानवर विजय मिळवला. ताश्कंद करार झाला. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्यावर दडपण आणले गेले. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आम्ही जिंकलेली जमीन तर गमावलीच, पण लाल बहाद्दूर शास्त्री यांच्यासारखा सुपुत्र गमावला. परिणाम आमच्या देशात बाह्य हस्तक्षेप वाढला. सन १९७१:भारत-पाकिस्तान युद्ध! आम्ही बांगलादेश निर्मिती करताना पाकिस्तानमध्ये फूट घडवून आणली. पण कायमस्वरूपी घुसखोर समस्या निर्माण केली. आमच्या ताब्यात ८०००० सैनिक शरण आले होते. त्यांना बिनशर्त सोडून देताना साधी pok परत करण्याची मागणी नाही केली. युद्धात जिंकून तहात आम्ही हरलो.
या युद्धात खरे तर हिरो होते जनरल माणेकशॉ! पण देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजी यास त्याचे श्रेय आम्ही दिले. त्यानंतर सिमला करार करून भारतीयांच्या आकांक्षांवर पाणी फिरवणाऱ्या याच पंतप्रधान होत्या. २६/११, ९३ बॉम्ब स्फोट, अक्षरधाम हल्ला, विविध बाँब स्फोट यात अतिरेक्यांना धर्म नसतो याचे तुणतुणे वाजवणाऱ्यांनी भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि देशाचे सीमा संरक्षण टांगणीवर टाकले होते. देशाच्या जमिनीविषयी, तिच्या सीमांच्या विषयी आणि आत्मसन्मानाविषयी एक निश्चित अभिमान आणि चाड लागते, तर युद्ध आणि चर्चा या देशाच्या हिताचे परिणाम साधतात. दुर्दैवाने देशाला फाळणीत ढकलून देणाऱ्या पक्षाच्या सरकारने कधीही देशाच्या संरक्षण सिद्धतेला महत्त्व दिले नाही. संरक्षण खरेदी हा पैसे कमावण्याचा धंदा बनवला आणि त्यामुळेच शस्त्रात्र बाबतीत कधीही आत्मनिर्भर बनवले नाही. शास्त्रज्ञ आणि सैन्य अधिकारी यांना मोकळीक दिली नाही. परिणामी भारत हा संरक्षण सिद्धतेत मागेच राहत गेला आणि त्या बाबतीतले परावलंबित्व वाढत गेले.
अटलजी यांच्या काळात आम्ही अण्वस्त्रधारी बनलो. जगाने आम्हाला दडपण आणले पण अटलजींनी ती सर्व दडपणे झुगारून देशात संरक्षण क्षेत्रात एका क्रांतीला भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुढाकाराने जन्म दिला. क्षेपणास्त्रे बनायला लागली. डाव्या इकोसिस्टीमने कलाम यांना ‘मिसाईल मॅन’असे उपरोधाने म्हणण्यास सुरुवात केली. पण याच क्षेपणास्त्र नीतीने आम्हाला अजेय, अजिंक्य बनवले असे लक्षात येते. मोदीजींच्या काळात तर संरक्षण सिद्धतेला अजून प्राधान्यक्रमाने सुरुवात झाली. मध्यंतरी यूपीए सरकारने त्याची गती रोखली होती, पण मोदीजी यांनी अधिक गतीने त्याला सुरुवात केली. कारगिल युद्धात अटलजी यांना अमेरिकन पोलीस, क्लिंटन यांनी अण्वस्त्र युद्धाचा धोका आहे, हे सांगितल्यावर भारत निम्मा होईल, पण उद्याच्या सूर्योदयाला पाकिस्तान देश जगाच्या नकाशावर राहणार नाही हे अटलजी यांनी त्यांना ठणकावून सांगितलेले उत्तर आणि आता न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग खपवून घेतले जाणार नाही, हे मोदीजी यांचे उद्गार हे एकाच राष्ट्रीय स्वाभिमानी जात-कुळातील आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा ऑपरेशन सिंदूर या सध्याच्या चालू असलेल्या सैन्याच्या कारवाईचा आणि कालच्या पंतप्रधान मोदीजी यांच्या भाषणाचा विचार करतो तेव्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो. असे नेतृत्व आणि असे विजीगिषू सैन्यदल जगात आपला दबदबा प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहे.
१९८२/८५ पासून Jklf नावाच्या संघटनेपासून काश्मीर अतिरेकी कारवायांना अधिक गती मिळाली. रवींद्र म्हात्रे या भारतीय अधिकाऱ्याची ब्रिटनमध्ये हत्या झाली. त्यानंतर अनेक पंडितांची हत्या, सातत्याने सर्व भारतभर अतिरेकी कारवायांना ऊत आला होता. खलिस्तान चळवळीची त्यात भर पडली... अनेक वेळा शाब्दिक धमक्या देऊन झाल्या . शिशुपाल अपराध करत होता आणि १०० अपराध होण्याची सुदर्शन चक्र वाट बघत होते. पहलगाम हा १०० वा अपराध ठरला आणि पाकिस्तान विनाशाच्या दिशेने वाटचाल करू लागला. अमेरिका, तुर्किस्तान, चीन कुणीही मध्यस्थी केली तरी आतंकवाद हे युद्ध समजले जाईल हा सज्जड दम , आता फक्त PoK वर चर्चा, टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड एकत्र चालणार नाही, रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहणार नाही या मोदींच्या भाषणातील वाक्यांनी केवळ पाकिस्तान नाही, तर विश्व समुदाय हादरून गेला असेल.
वास्तविक आतंक विरोधातील ही लढाई जगाच्या वतीने भारत लढत आहे, त्यासाठी प्रचंड नुकसान सहन करत आहे. अशावेळी भारताच्या बाजूने उभे राहण्याऐवजी अमेरिका, चीन दुट्टप्पी धोरण ठेवत आहे. हे माणुसकीच्या आणि जगाच्या दृष्टीने खूप नुकसानकारक आहे. युद्ध जसे जगाला परवडणारे नाही, तसे आतंकवाद पण जगाला परवडणारा नाही हे ठणकावून सांगणारे पंतप्रधान आम्हाला लाभले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. शेवटी, सोमवारी बौद्ध पौर्णिमा होती. बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला. पण बुद्धांचे पुतळे उद्ध्वस्त करणारी वृत्ती फोफावणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करणारी शक्ती पण आवश्यक आहे. त्यामुळे जशी बौद्ध पौर्णिमा होती त्या अगोदरच नरसिंह जयंती पण होती आणि भारत हा बौद्धांचा देश आहेच पण मातलेल्या हिरण्यकश्यपूना यमसदनास पाठवणारा नरसिंहांचा पण देश आहे हे विसरता येणार नाही.
मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या डाव्या आणि काँग्रेसी पाकिस्तान धार्जिणा इकोसिस्टीमपेक्षा ओवेसींनी जी भूमिका घेतली ती जास्त स्वागतार्ह म्हणावी लागेल. तथाकथित बिळात लपलेले सेलिब्रेटी छोट्या-छोट्या गोष्टींवर ट्विट करतात, पण त्यांना भारतीय सैन्याचे कौतुक करावे वाटले नाही हे पण जनतेच्या लक्षात आले आहे. स्वरा भास्करसारखी तिनपाट बाई मात्र सैन्यदल आणि भारतीयांना अपशकून करण्यात आघाडीवर आहे हे पण जनतेच्या लक्षात आले आहे.
मोदीजी यांनी दुर्लक्ष करत, अनुल्लेखाने जगाचे पोलीस बनलेल्या अमेरिकेला आपली जागा तर दाखवली पण आम्ही आता शस्त्र निर्यात करणारे आहोत आणि आमचे ब्रह्मास्त्र ब्रह्मोस हे आमचे संरक्षण करण्यात सिद्ध आहे हे स्पष्ट केले आहे.
एकूणच पहलगाममधील घटनेनंतर भारतीयांची निर्माण झालेली एकजूट, त्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानचे उद्ध्वस्त झालेले अतिरेकी अड्डे, एअर बेस कॅम्प आणि सैनिक कॅम्प आणि काल पंतप्रधान मोदीजी यांचे भाषण यातून भारतीय नरसिंह जागृत झाला आहे, याची जाणीव संपूर्ण जगाला आणि भारतातील देशद्रोही, छद्मी धर्मनिरपेक्ष लोकांना पण धडकी भरवणारी आहे. मोदीजी यांची भाषण करतानाची देहबोली ही जणू मुलतानची भूमी त्यांना खुणावत आहे अशी होती, अर्थात वाचकांच्या माहितीसाठी, नरसिंह अवतारभूमी आणि भक्त प्रल्हाद यांची जन्मभूमी मुलतान आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर गेल्या ७८ वर्षांतील जागृत झालेला हा नरसिंह अवतार भारताला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगणारा आणि अखंड भारताच्या स्वप्नाकडे वाटचाल करणारा आहे.