जळगाव : अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली. अपघातामुळे मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरुन पडले आहेत. या अपघातामुळे आसपासच्या रुळांचेही नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनात रुळांच्या डागडुजीचे काम सुरू झाले. तसेच मालगाडीचे रुळांवर अस्ताव्यस्त पडलेले डबे उचलून व्यवस्थित एका बाजूस ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या नियमानुसार, अपाघाताची चौकशी होणार आहे.
भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला निघालेल्या मालगाडीला अमळनेर स्थानकाजवळ अपघात झाला. गुरुवार १५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातात जीवितहानी झालेली नाही. पण रुळांचे नुकसान झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरत-भुसावळ रेल्वे या मार्गावरुन दररोज हजारो प्रवासी करतात. या प्रवाशांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.