Thursday, May 15, 2025

क्रीडा

सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने नेपाळला हरवले

सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने नेपाळला हरवले

उपांत्य फेरीत मालदिवशी सामना


युपीया : भारताने येथे सुरू असलेल्या यू-१९ सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये नेपाळचा पराभव करून गट ब मधील अग्रस्थान निश्चित केले. भारताने ही लढत ४-० अशी जिंकली.


रोहेन सिंग छापामयुमने (२८ व ७६) दोन तर स्थानिक खेळाडू ओमंग डोडमने (२९) व डॅनी मैतेई (८४) यांनी एकेक गोल नोंदवला. भारताने दोन्ही सामने जिंकून ६ गुणांसह गटात अग्रस्थान मिळविले. भारताचा गोलांचा फरकही १२ गोलांचा आहे. नेपाळने दोन सामन्यातून ३ गुण घेत गटात दुसरे स्थान मिळविले. शुक्रवारी दि. १५ रोजी भारताची उपांत्य लढत गट अ मधील दुसऱ्या स्थानावरील संघ मालदिवशी होईल, तर दुसरा उपांत्य सामना बांगलादेश व नेपाळ यांच्यात होईल.


दोन्ही संघांनी उपांत्य फेरी याआधीच निश्चित केली होती. त्यामुळे गटात अग्रस्थान कोण मिळविणार याबाबत या सामन्यात उत्सुकता होती. दोन्ही संघ अग्रस्थान पटकावण्यासाठी कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे सामन्यात दिसून आले. मात्र गोल करण्यास सुरुवात झाल्यानंतर भारताने स्वत:चे वर्चस्व सिद्ध केले. मलेम्नगाम्बा सिंगने डाव्या पायाने मारलेला चेंडू काही जणांनी हेडिंग केल्यानंतर डाव्या बगलेतून रोहेनकडे क्रॉस पास आला. त्याने लगेचच चेंडू स्लाईड करीत नेपाळ गोलरक्षक भक्त बहादुर पेरियारला हुलकावणी देत २८ व्या मिनिटाला गोल नोंदवला. एका मिनिटानंतर ही आघाडी २-० अशी केली. त्याने डॅनीकडून मिळालेल्या पासवर साईडफूटने टॉप कॉर्नरवर फटका मारत हा गोल केला.


दोन गोलांच्या आघाडीमुळे भारताचा आत्मविश्वास दुणावल्याने त्यांनी आणखी वर्चस्व गाजविले. उत्तरार्धात ओमंग, डॅनी व प्रशान या त्रिकुटाने नेपाळच्या बचावफळीची परीक्षाच घेतली. सामना संपण्यास १४ मिनिटे बाकी असताना भारताने त्यात तिसऱ्या गोलाची भर घातली. प्रशान जाजोने डॅनीला लो कट बॅकपास पुरविला, त्याने पेनल्टी स्पॉटजवळून जोरदार फटका लगावला. पण पेरियारने तो वाचवला. पण रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ताबा घेत रोहेनने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवला. सामन्यात प्रभावी प्रदर्शन केलेल्या डॅनीला सामना संपण्यास सहा मिनिटे असताना संधी मिळाली. कर्णधार सिंगामयुम शमीचा लांबवरून मारलेला फटका पेरियारने थोपविल्यानंतर रिबाऊंड झालेला चेंडू डॅनीने अचूक गोलपोस्टमध्ये ढकलला. डॅनीने लंकेविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक नोंदवली होती.

Comments
Add Comment