Thursday, May 15, 2025

पालघर

उन्हाच्या दाहकतेसोबतच चार तालुक्यांत पाणीटंचाईचे चटके!

उन्हाच्या दाहकतेसोबतच चार तालुक्यांत पाणीटंचाईचे चटके!

१२८ गावपाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा


पालघर : वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची दाहकता देखील वाढत चालली आहे. मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील आणखी काही पाड्यांमध्ये १० मे पासून टँकर सुरू करण्यात आल्याने आता एकूण १२८ गावपाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये नेहमीच पाणी टंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ या तालुक्यांमधील ग्रामस्थांवर येते. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वीच मोखाडा आणि वाडा तालुक्यातील काही पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. यावर्षी सुद्धा वाडा व मोखाडा या दोन तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये सुद्धा पाणीटंचाईची समस्या मार्च महिन्यापासून दिसून येत आहे. दरम्यान मोखाडा तालुक्यातील पाणीटंचाई पाहता या तालुक्यात ७ जानेवारीपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर वाडा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त पाड्यांसाठी २९ जानेवारीपासून तर जव्हार तालुक्यातील पाड्यांमध्ये ४ फेब्रुवारीपासून आणि १० एप्रिलपासून विक्रमगड तालुक्यातील चार टंचाईग्रस्त पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अशाप्रकारे १५ एप्रिलपर्यंत चार तालुक्यातील ४८ पाडे आणि ६ गावांसाठी दररोज १७ टँकरच्या माध्यमातून ५२ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईची चटके सुद्धा जाणवू लागले आहेत. त्यामुळे १५ एप्रिलनंतर आणखी २२ पाड्यांमध्ये आणि ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर आता आणखी पाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने मे महिन्याच्या सुरुवातीला आणि दुसऱ्या आठवड्यापासून टंचाईग्रस्त पाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता चार तालुक्यात एकूण १२८ गावपाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.



३८ हजार पशुधनासाठीही पाण्याची सोय


चार तालुक्यातील १२८ गाव पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्या ठिकाणच्या ४३ हजार २७७ नागरिकांसह ३८ हजार १५७ पशुधनाचा विचार करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाडा तालुक्यातील ३८ गाव पाड्यांमध्ये ९ हजार १४ नागरिकांसाठी, तर सर्वाधिक अशा २५ हजार ५६९ पशुधनासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. चार तालुक्यातील नागरिक आणि पशुधन मिळून एकूण ८१ हजार ४३४ जन व पशुधन संख्येसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


एका दिवशी १११ टँकरच्या फेऱ्या : टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये दररोज ३७ टँकरद्वारे १११ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. मोखाडा तालुक्यात ३९ फेऱ्यांद्वारे, जव्हार तालुक्यात टँकरच्या ४२ फेऱ्यांद्वारे, वाडा तालुक्यात २२ फेऱ्यांद्वारे तर विक्रमगड तालुक्यात ८ फेऱ्या करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


पाणीटंचाई निर्माण होत असलेल्या गावपाड्यातून मागणी येताच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांप्रमाणेच तेथील पशुधनाचा विचार करून टँकरच्या फेऱ्या नियोजित करण्यात येतात. पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरीच्या कामासोबत इतर उपाययोजनांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी, अधिकारी जिल्हा परिषद पालघर

Comments
Add Comment