
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात आज. गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झालेत. त्राल भागातील नादिर गावात झालेल्या चकमकीत आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वणी आणि यावर अहमद भट हे 3 दहशतवादी (Indian Army killed Terrorists) ठार झालेत.
दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज, गुरुवारी पहाटे भारतीय सैन्य, जम्मू- काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तरित्या नादर, त्राल, अवंतीपोरा येथे घेराबंदी आणि शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान सतर्क जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनंतर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युतर दिले.
यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये 48 तासांतील ही दुसरी चकमक आहे. शोपियान जिल्ह्यातील केलर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी त्राल येथे ही चकमक घडली.