
भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या व्यक्तिमत्वाची कथा आजपर्यंत हिंदी सिनेमात साकारण्यात आली नव्हती. मात्र आता ही सिनेमाच्या जन्माची कथा, सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे.हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी मांडणार आहे. ज्यांनी शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली.
या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. 'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनानंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. चित्रपटासाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत.
चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत.