
मनाचा गाभारा : अर्चना सरोदे
नुकत्याच मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. मे महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते आजोळ म्हणजेच मामाचं गावं. प्रत्येक मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी एखाद्या मौंजीबंधन, लग्नप्रसंग व मे महिना असे वर्षातून एकदाच आजोळी जायला मिळत असे. “झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी”... असे गाणे म्हणत त्या दिवसाची वाट बघण्यात पूर्ण वर्ष निघून जायचं. आजही आजोळ आठवलं की डोळ्यांसमोर येते ती आजोळची अल्हाददायी पहाट. पहाटे पहाटे जाग यायची तीच मुळी आजी म्हणायची त्या ओव्यांनी. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने घरामध्ये पंचवीस-तीस जणांचा राबता असायचा. आजी नेहमी चार वाजता उठायची. उठल्यावर अंगणात सडा सारवण करून त्यावर सुंदर रांगोळी काढली जायची. अंघोळ वैगेरे आटोपून अंगणातील तुळशी वृंदावनातील तुळशीची पूजा करून ती जात्यावर बसत असे, तिच्यासोबत मामी पण बसत असे आणि दोघी मिळून ओव्या म्हणत असत. पहाटे आजीच्या ओव्यांनी जाग येणं म्हणजे पूर्ण दिवस मन प्रसन्न राहणं.
पहिली माझी ओवी गं,
हात खुंट्याला लाविला
देव तो विठ्ठल पहिला
ओवीला गाईला !!
दुसरी माझी ओवी गं
जात्याच्या पाळीला
ओवीला गं लेक बाई
माझ्या वनमाळीला!!
या ओव्या ऐकता ऐकता आम्हाला जाग यायची. त्या ओव्यांमधून देवांची चरित्रे, ऐतिहासिक गोष्टी यांचे देखील वर्णन व्हायचे. अंघोळी वगैरे आटोपून देवघरात सर्व आरतीला जमायचे. तोवर आजोबांची पूजा झालेली असायची. आरती झाल्यावर सर्वजण एकत्र बसून न्याहारी करायचो. नंतर मामा आम्हाला गाव फिरवायला नेत असे. गड किल्ले करायला, विहीरीत पोहायला शिकवत असे. आता मात्र गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे म्हणण्याची वेळ आली आहे. आता विभक्त कुटुंब पद्धती आल्याने आजोळ पण विभक्त झाले आहे. मातीचे अंगण जाऊन तिथे काँक्रीटचे अंगण झाले. पहाट आता सकाळी सहा वाजता होते. जात्याचा उपयोग फक्त लग्नप्रसंगी होतो. आता पहाटेच्या ओव्यांऐवजी भांड्यांच्या आवाजाने जाग येते. सुट्ट्यांमधले मामाचे गाव हरवत चालले आहे. त्यातील मायेचा ओलावा संपत चालला आहे. आता आम्ही सुट्ट्या लागण्याआधी टूर्स पॅकेज बुक करतो. यावर्षी आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत. आम्ही पुढच्या वर्षी येतो असे कारणं सांगतो. वाट पाहत असलेल्या वृद्ध डोळ्यांतले पाणी जर आम्हाला दिसत नाही तर त्या कंपित आवाजातल्या ओव्या आमच्या मुलांना कशा साद घालणार? कशी आमच्या मुलांना नाती काय असतात, गावाकडची संस्कृती काय असते, एकत्र कुटुंबपद्धती काय असते हे कळणार. फक्त पुस्तकात वाचून हे ज्ञान उपयोगाचे नाही, तर त्याला मायेचा स्पर्श सुद्धा असायला हवा. तरच ते हृदयाच्या कुपीत जतन करता येईल आणि त्याचा सुगंध पिढी दर पिढी वाढत राहील. काळानुसार जीवनशैली बदलली आहे हे अगदीच मान्य आहे पण जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा सर्वांनी नियोजन करून एकत्र जमून नात्यांमधील मायेचा ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर पुढील पिढीला फक्त आई, बाबा आणि मुलगा/ मुलगी हीच नाती फक्त माहीत होतील. तसेच नुसते एकत्र जमून मोबाइलमध्ये रमणे हा देखील त्याच्यावरचा उपाय नाही. तर सर्वांनी जेवण, चहा, न्याहारी एकत्र करत असताना प्रत्येकाने आपापल्या लहानपणाचे गोड अनुभव सांगितले पाहिजेत. तसेच मोठ्यांचा आदर व लहानांवर प्रेम कसे केले जाते हे आपल्या वागण्यातून दाखवून दिले पाहिजे. मोठ्यांना उलट बोलणे, कसे चुकीचे आहे हे समजावून सांगितले पाहिजे. हीच तर आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीचे पाश्चिमात्य देशांनी अनुकरण करायला घेतले आहे मग आपली ही संस्कृती आपल्या लहानांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी नाही का? प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात तेव्हा आज तुम्ही जसं त्यांच्या समोर वागाल ते सुद्धा तुमच्यासोबत तसेच वागतील. कित्येक घरांमध्ये सकाळी उठल्यावर मोठ्याने इंग्रजी गाणी लावली जातात आणि ही मंडळी अभिमानाने सांगतात की आमची मुले इंग्रजी गाणी, इंग्रजी सिरीयलच पाहतात. कसला वृथा अभिमान म्हणावा हा... आणि जेव्हा हीच मुले नोकरीनिमित्त परदेशी जाऊन स्थायिक होतात तेव्हा कुठे जातो हा अभिमान? आज पाश्चिमात्य देशांची सकाळ “ओंकार” उच्चाराने होते. आपल्याकडे जरी पहाटेच्या ओव्या ऐकू येत नसल्या तरी प्रत्येक घराघरांत किमान “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।” हा श्लोक म्हटला गेला पाहिजे. लहान मुलं मातीसारखी असतात त्यांना तुम्ही जसं घडवाल तशी ती घडतील. लहान मुलांची आकलन शक्ती जास्त असते तुम्ही सतत त्यांना श्लोक, स्तोत्र ऐकवत राहिलात किंवा तुम्ही स्वतः म्हणत राहिलात तर ती मुले लवकर आत्मसात करतात. अलीकडे तर संध्याकाळच्या वेळी पाढे, गोष्टी सांगणे हे एखाद दुसरा अपवाद वगळता पूर्णतः बंद झाल्या आहेत.
सात वाजता सिरीयल चालू होतात म्हणून आम्ही देवापुढे दिवा सुद्धा साडे सहालाच लावतो. मग मला सांगा मुलांनी, नातवंडांनी पुढे तीच परंपरा चालू ठेवली, तर यात दोष त्यांना का म्हणून द्यायचा. ते तेच करतात जे त्यांनी लहानपणापासूनच बघितलं आहे. आजोळच्या संस्कृतीच्या शिदोरीची चव ज्यांनी ज्यांनी चाखली त्यांनी पुढच्या पिढीला सुद्धा त्यातील गोडी चाखायला द्यावी... निदान प्रयत्न तरी करायला हवाच!