
हेली मॅथ्यूजकडे कर्णधारपद
नवी दिल्ली : क्रिकेट वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या आगामी दौऱ्यासाठी १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. हा दौरा २१ मे ते ८ जून दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तीन टी-२० सामने आणि तीन एकदिवसीय सामने असतील. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा स्टार अष्टपैलू हेली मॅथ्यूज करणार आहे, तर शेमेन कॅम्पबेल उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक पात्रता सामन्यांच्या तुलनेत संघात दोन बदल करण्यात आले आहेत. २० वर्षीय गयानाची अष्टपैलू खेळाडू रेलियाना ग्रिमंड आणि सेंट किट्सची वेगवान गोलंदाज जहांझारा क्लॅक्सटन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू रशादा विल्यम्स (यष्टीरक्षक-फलंदाज) आणि चिनेल हेन्री (अष्टपैलू खेळाडू) यांच्या जागी संघाचा भाग बनले आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडिज महिला संघ १३ मे रोजी इंग्लंडला रवाना होईल. मालिकेची सुरुवात २१ मे रोजी कॅन्टरबरीच्या स्पिटफायर मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याने होईल.