Tuesday, May 13, 2025

नाशिक

रस्ता कामात झाडांच्या मुळ्या उघड्यावर

रस्ता कामात झाडांच्या मुळ्या उघड्यावर

पर्यावरणप्रेमींनी कारवाईची केली मागणी


सिडको : खुटवडनगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरू असून, सुमारे वीस कोटी रुपयांचा खर्च करून एक किलोमीटर लांब आणि बारा मीटर रुंद सिमेंट रस्ता तयार केला जात आहे. मात्र या विकासकामांमध्ये पर्यावरणाची गंभीर पातळीवर हानी होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.


सदर रस्त्याच्या कामादरम्यान, ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शेकडो झाडांच्या मुळ्या उघड्यावर पाडल्या आहेत. यामुळे या झाडांचे मूलभूत आधार कमजोर झाले असून, पावसाळ्याच्या तोंडावर ही झाडे कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


झाडे पडल्यास नागरिकांच्या जीवितास तसेच संपत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.
याआधी रस्त्यासाठी ४८ झाडे तोडण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, परंतु पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यामुळे ती मागणी फेटाळण्यात आली होती.


आता झाडांच्या मुळ्या उघड्यावर ठेवल्याने ही झाडे नैसर्गिकरीत्या पडावीत आणि प्रशासनाची परवानगी न घेता ठेकेदाराला रस्ता करणे सुलभ व्हावा, असा नियोजित डाव असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत.


या प्रकारावर तत्काळ लक्ष देत, वृक्षप्रेमी सुमित शर्मा व नितिन कोरडे यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले असून, झाडांच्या मुळ्यांची त्वरित योग्य देखभाल करण्यात यावी आणि ठेकेदारावर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.



एकीकडे हरित नाशिकसाठी शपथ घेतली जाते, तर दुसरीकडे अशा दुर्लक्षामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे शहर विकासात पर्यावरणीय समतोल राखणे काळाची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


निसर्गावर होणारे हे आक्रमण थांबवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. अन्यथा झाडे नष्ट होण्यासह त्याच्या पर्यावरणीय परिणामांची जबाबदारी मनपावर राहील. ठेकेदारास राजकीय पाठबळ आहे. राजकीय पक्षाचे काही स्थानिक कार्यकर्ते देखील आम्हाला धमकी देत आहेत.
सुमित शर्मा, पर्यावरणप्रेमी

Comments
Add Comment