
प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करण्याचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
महाराष्ट्र सागरी मंडळ येथे मंडळाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस सागरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये यांच्यासह मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
बंदर वापरण्याचे थकलेले शुल्क वसुलीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन मंत्री मंत्री राणे म्हणाले की, थकबाकीदारांना फक्त नोटीस पाठवून वसुली होत नसेल तर पुढील योग्य ती कार्यवाही करावी. विभागाचा महसूल वाढवण्यासाठी जाहिरात होर्डिंग्ज उभारणी, जागांचे भाडे यामध्ये सुधारणा करावी. जास्तीत जास्त निधी खर्च करावा जेणेकरून पुढील वर्षी जास्तीच्या निधीची मागणी करता येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
मंत्री राणे म्हणाले की, थकित शुल्क वसुली सोबतच पोर्ट ऑपरेटरना येणा-या अडचणीवरही मंडळाने तोडगा काढावा त्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. यासंदर्भात बैठक आयोजित करावी. दर आकारामध्ये एकसूत्रता ठेवावी.
यावेळी बंदरांमधील गाळ काढणे, बंदराची क्षमता वाढवणे, पूर्ण क्षमतेने बंदर चालवणे या विषयही चर्चा करण्यात आली.