
१५ ठिकाणी दरड कोसळण्याचे संकट!
विरार : रायगडच्या इर्शाळवाडीतील भीषण दरड दुर्घटनेचं सावट आता वसई-विरारवर घोंगावतंय. महापालिकेच्या अधिकृत यादीनुसार तब्बल १५ ठिकाणी दरड कोसळण्याचा थेट धोका आहे. गेल्या वर्षी वाघरळ पाड्यावर ज्या प्रकारे दरड कोसळून मृत्यूचे तांडव घडलं, तसंच काहीसं चित्र पुन्हा घडण्याची शक्यता पालिकेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच येथील रहिवाशांची भीतीने गाळण उडाली असून पोटात गोळा आला आहे.
धोक्याचे १५ 'हॉटस्पॉट्स'?
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पुढील ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका आहे. मोरेगाव डोंगर, आचोळे डोंगरी, पडखड पाडा, पांच आंबा, शिर्डी नगर, काजू पाडा, निळेगाव, वालाई पाडा, नवजीवन डोंगरी, सतीवळी खिंड, वाघरळ पाडा, कुंडा पाडा, जानकी पाडा, गोखीवरे आलन पाडा ही ठिकाणं नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'रेड अलर्ट'वर आहेत.

गर्डर उतरवण्यासाठी मध्य रेल्वेवर आज, उद्या रात्री कांजूरमार्ग- मुलुंड दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक मुंबई : मध्य रेल्वे बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री ...
पालिकेचीही कबुली, "धोका आहे खरा!"
वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १५ ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडू शकते, अशी संभाव्य अपघातजन्य ठिकाणांची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रशासनाने तयार केली आहे. पालिकेच्या अग्निशमन विभागाचे दिलीप पालव यांनी स्पष्ट केलं की, "आपली टीम २४ तास सज्ज आहे, पण नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. धोका हलका नाही."
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले, "रिक्षामधून बॅनर लावून सतत जनजागृती सुरू आहे. जिथे धोका आहे, तिथे राहू नका, हे आवाहन आम्ही सातत्याने करत आहोत."
वैद्यकीय विभाग सज्ज
वसई -विरार शहरात अशा दुर्घटना घडल्यास जखमी रुग्णांवर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी दिली आहे.
इर्शाळवाडीतील भीषण अनुभव विसरलात का?
इर्शाळवाडी दुर्घटनेत संपूर्ण गाव ढिगा-याखाली गाडलं गेलं होतं. रात्रीच्या झोपेतच अनेकांना मृत्यूने गाठलं होतं. तोच इतिहास वसई-विरारमध्ये पुन्हा लिहिला गेला, तर जबाबदार कोण?
"पावसाळा आणखी रौद्र होणार!"
हवामान विभाग आणि भूवैज्ञानिक तज्ज्ञांनी यंदाच्या पावसात अधिक दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेने 'फायर फायटिंग' ऐवजी 'डिझास्टर प्रिवेन्शन'वर भर द्यावा, अशी मागणी जोर धरतेय.
जीव वाचवायचा आहे तर... धोका असलेल्या ठिकाणी राहू नका!
पालिकेने दाखवलेला 'रेड मॅप' म्हणजे तुम्ही कुठे उभं राहायचं, कुठे नाही याचा निर्णय येथील लोकांनीच घ्यायचा आहे. मातीचा ढिगारा कधीही तुमच्यावर कोसळू शकतो. खबरदारी घ्या, जागृत राहा.