Tuesday, May 13, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'मी नसतो तर भारत-पाक युद्धात लाखो ठार झाले असते'; ट्रम्प यांनी वाजवली पुन्हा टिमकी

'मी नसतो तर भारत-पाक युद्धात लाखो ठार झाले असते'; ट्रम्प यांनी वाजवली पुन्हा टिमकी

वॉशिंग्टन : “जर मी हस्तक्षेप केला नसता, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटलं असतं आणि लाखो लोकांचा जीव गेला असता,” असं विधान करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे घेतलं आहे. अमेरिका-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्ष थांबवण्यात आपली भूमिका निर्णायक असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणत ऐतिहासिक कामगिरी केल्याचे म्हटले आहे.


ते म्हणाले, “मला युद्ध आवडत नाही. माझ्या कार्यकाळात भारत-पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष भडकत होता, पण मी हस्तक्षेप केला. मी दोन्ही देशांना सांगितलं, अण्वस्त्रांचा व्यापार नको, सुंदर वस्तूंचा व्यापार करा.” ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या या संवादामुळे दोन्ही देशांचे नेते शांततेच्या मार्गावर आले.



“तेव्हा परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. संघर्ष वाढत होता. मी हस्तक्षेप केला नसता, तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते,” असं ट्रम्प ठामपणे म्हणाले.


दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनीही भारत-पाकिस्तानमधील थेट संवादाचे स्वागत करत दोन्ही देशांच्या नेतृत्वाच्या संयमाची प्रशंसा केली.


मात्र, भारताने ट्रम्प यांचा व्यापारी संवादाचा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे.


ट्रम्प यांच्या या 'मीच सगळं केलं' शैलीतील दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

Comments
Add Comment