
दर्शनाला येताना विशिष्ट प्रकारच्या पेहराव्यात येणे भाविकांना बंधनकारक
कोल्हापूर : कोल्हापूरमधील अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गुरुवारपासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराकडून सोवळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता भाविकांना दर्शनाला येताना विशिष्ट प्रकारच्या पेहराव्यात येणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. या निर्णयाबाबत अधिकृत निवेदन देवस्थान समितीकडून जारी करण्यात आले आहे.
परीक्षा संपल्या असून मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे अनेक जण सुट्ट्यांमध्ये विविध देवस्थानांना भेटी देतात. एरवीदेखील अनेक जण देव दर्शनासाठी जात असतात. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामध्येच आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. यापूर्वीही राज्यातील अनेक देवस्थानांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अष्टविनायक गणपतीसह ५ मंदिरांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ५ मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. चिंचवड देवसंस्थानकडून यापूर्वी यासंबंधित पत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली होती. विविध देवस्थान ट्रस्टकडून कपड्यांबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच जोतिबा मंदिर हेही पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि मोठे मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी पारंपरिक वर्तन आणि कपड्यांची शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे. धार्मिक परंपरेचा आदर राखत आम्ही हा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात असलेल्या भक्तिमय वातावरणात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भाविकांनी या नियमांचे पालन करून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.