
लखनऊ : उत्तर प्रदेशातील जेवर येथे भारताच्या सहाव्या आणि उत्तर भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर युनिटच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. India Semiconductor Mission अंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पात एचसीएल ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्यात सुमारे ३,७०६ कोटींचा संयुक्त उपक्रम होणार आहे. यामुळे राज्याला मोठी औद्योगिक संधी मिळणार असून सुमारे २,००० थेट नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हे युनिट उत्तर प्रदेशातील पहिले चिप उत्पादन केंद्र असेल. या प्रकल्पामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स, पीसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी अत्यावश्यक असलेल्या डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार केल्या जातील. उत्पादन सुरू होण्याची तारीख २०२७ अशी निश्चित करण्यात आली आहे.

इस्रायल : गाझा पट्टी पुन्हा एकदा रणभूमी झाली आहे. इस्रायलने शनिवारी (१० मे) गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात किमान ६० नागरिकांचा मृत्यू झाला ...
उत्तर प्रदेशच्या यमुना एक्स्प्रेसवे औद्योगिक प्राधिकरण क्षेत्रात, जेवर विमानतळाजवळ हे युनिट स्थापन केले जाईल. एचसीएलचा हार्डवेअर उत्पादनातील अनुभव आणि फॉक्सकॉनची जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती क्षमता यांचा मेळ या प्रकल्पाला अधिक भक्कम बनवत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सेमीकंडक्टर उत्पादनात अग्रगण्य राज्य म्हणून उदयास येत आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे."
भारताचा सेमीकंडक्टर उत्पादनातील सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे हे आणखी एक धाडसी पाऊल मानले जात असून, यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जागतिक नेतृत्वाच्या दिशेने प्रगती करत असल्याचे संकेत मिळत आहेत.